दहशतवादाच्या संशयावरून नागपुरातून दोघेजण ताब्यात

crime
crime

नागपूर : लष्कराच्या गुप्तचर पथकाने शुक्रवारी उपराजधानीतील भालदारपुरा भागातून दोघांना ताब्यात घेतले. "टेरर लिंक'च्या संशयातून त्यांच्या मुसक्‍या आवळण्यात आल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. मात्र, या कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात येत असल्याने विस्तृत माहिती अथवा अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. 

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई येथील लष्कराच्या गुप्तचर पथकाकडून गेल्या काही दिवसांपासून भालदारपुरा परिसरात गुप्तपणे पाळत ठेवण्यात येत होती. प्रामुख्याने युवकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात होते. शुक्रवारी सायंकाळी गुप्तचर पथक भालदारपुरा भागात धडकले आणि दोघांना सोबत घेऊन गेले. त्यांना कुठे नेण्यात आले याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनाही या कारवाईबाबत माहिती नसली तरी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली असल्याचे कळते. ताब्यात घेण्यात आलेल्यांबद्दलही वृत्त लिहिस्तोवर माहिती कळू शकली नाही. नोएडा, रायबरेली या ठिकाणीसुद्धा एकाचवेळी कारवाई करीत काही युवकांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. 

ब्रह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला पुरविल्याच्या आरोपाखाली "डीआरडीओ'चा अभियंता निशांत अग्रवाल याला उत्तर प्रदेश एटीएस आणि लष्कराने ऑक्‍टोबरमध्ये नागपुरातून अटक केली. त्याच्या फ्रेसबुक फ्रेण्ड्‌सवरही लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्याच्याशी संबंधित असणाऱ्यांवर पाळत ठेवली जात होती. परंतु, निशांत आणि आज ताब्यात घेण्यात आलेल्यांचा काही संबंध आहे की नाही, याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. लष्करी कारवाईसंदर्भात विचारणा करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर दिले नाही. याशिवाय अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कानावर हात आणि तोंडावर बोट अशी भूमिका घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com