बेंटेक्‍सच्या दोन व्यापाऱ्यांची अवैध पिस्तूल खरेदी

बेंटेक्‍सच्या दोन व्यापाऱ्यांची  अवैध पिस्तूल खरेदी
नागपूर : इतवारीतील बेंटेक्‍स ज्वेलरी विकणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांना अवैधरीत्या पिस्तूल आणि काडतूस खरेदी करताना पाचपावली पोलिसांनी छापा घालून विक्रेत्यासह चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वैशाली नगरातील सागर बारमध्ये करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नीतेश रमेश राऊत (वय 35, जयभोलेनगर, पाचपावली) आणि कोमल देवीदास राऊत (वय 40, रा. वैशालीनगर) हे दोघे बेंटेक्‍स ज्वेलरीचे मोठे व्यापारी आहेत. त्यांची इतवारीत मोठमोठी दुकाने आहेत. त्यांना पिस्तूल आणि काडतूस खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी सचिन बाबूराव मेश्राम (वय 36, रा. धम्मानंदनगर, पिवळी नदी) याला पिस्तूल विक्रेत्यांना शोधण्यास सांगितले. त्याने अनिकेत ऊर्फ टिनू रवी घाणेकर (वय 24, वैशालीनगर) याची भेट घेतली. दोघांनी पाचपावलीतील वैशालीनगरातील सागर बार येथे पिस्तूल खरेदी-विक्रीचा सौदा करण्याचे ठरविले. रविवारी रात्री 11 वाजता टिनू घाणेकर आणि सचिन मेश्राम हे पोहचले. अर्ध्या तासात व्यापारी राऊत बंधूही बारमध्ये पोहोचले. त्यांनी पैशाची देवाणघेवाण करीत पिस्तूल ताब्यात घेतले. याची टीप पाचपावलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांना मिळाली. त्यांनी लगेच पथकाला सागर बारजवळ सापळा रचण्याचे आदेश दिले. राऊत बंधू पिस्तूल घेऊन बाहेर पडताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तर पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या टिनू घाणेकर आणि सचिन मेश्राम यांनाही अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतूस आणि बुलेटसह तीन वाहने जप्त केली. आरोपींना 19 सप्टेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चंद्रपूरशी जुळले तार
चंद्रपुरातील कुख्यात गुंड बाल्या ऊर्फ प्रणव हा पिस्तूल खरेदी-विक्री करणारा मोठा दलाल आहे. बाल्याकडून दोन्ही पिस्तूल टिनू घाणेकरने विकत घेतले होते. टीनू हा मेयो हॉस्पिटलमध्ये ऍम्बुलन्स चालक म्हणून नोकरीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाल्याकडून विकत घेतलेले पिस्तूल राऊत बंधूंना विक्री करण्यात येत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com