चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात "संगीत खुर्ची, राजकीय नेतेही सहभाग

new-chandrapur
new-chandrapur

चंद्रपूर : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर बारा तासांच्या आत नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आपला पदभार स्वीकारला. खेमनार यांनी आपला पदभार अद्याप सोडलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील "संगीत खुर्ची' ने प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार नरेश पुगलिया आणि कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कोरोनाचे संकट संपेपर्यंत खेमनार यांनाच जिल्हाधिकारीपदी कायम ठेवा, अशी विनंती केली. यानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीवरून सत्ताधाऱ्यांमध्येच दोन गट पडल्याचे समोर आले. जनविकास सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याच मागणी साठी आंदोलन केले.

सन २०१८ मध्ये डॉ. कुणाल खेमनार रुजू झाले. त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण व्हायचा आहे. सामान्य माणसांना सहज उपलब्ध होणारे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कोरोनाचे संकट आल्यानंतर डॉ. खेमनार यांचे काम जिल्हावासींना भावले. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. या ज्ञानाचा उपयोग कोरोनाच्या लढाईत झाला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना संक्रमित सापडला असताना तब्बल दोन महिन्यांपर्यंत या जिल्ह्यात एकालाही कोरोनाची लागण झालेली नव्हती. याचे श्रेय जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्याच नियोजनाला जाते, असे प्रशासनातील अधिकारी सांगतात.

आता रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत असताना अचानक त्यांची बदली झाली. त्यांच्याऐवजी अजय गुल्हाने यांना चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. डॉ. खेमनार यांनी आपल्या कार्यकाळात चुकीचे निर्णय होऊ दिले नाही. याच कारणाने त्यांची उचलबांगडी करण्यासाठी मोठे लॉबिंग झाल्याची चर्चा आहे. यासाठी मोठ्या "अर्थ'पूर्ण तडजोडी झाल्याचे समजते. दरम्यान, प्रधान सचिवांनी खेमनार यांना बदलविणार नाही, असे सांगितले.

गुल्हाने यांनी बदलीचा आदेश मिळताच मुंबईवरून थेट चंद्रपूर गाठले आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना पदभार स्वीकारला. यावेळी डॉ. खेमनार कार्यालयात नव्हते. प्रशासकीय संकेतानुसार जुने जिल्हाधिकारी नव्या जिल्हाधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवितात. परंतु येथे खेमनार यांनी आपला कार्यभार सोडला नसतानाही गुल्हाने त्यांच्या खुर्चीत जावून बसले. दुसरीकडे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या काही लोकप्रनिधिनींनी खेमनार यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले. पालकमंत्री मात्र गुल्हाने यांच्या पाठीशी असल्याचे समजते.

या पार्श्‍वभूमीवर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदलीवरून कॉंग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. दरम्यान, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही डॉ. खेमनार यांच्या बदलीवर "अंधेर नगरी चौपट राजा'अशा शब्दात सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांनीही मुख्यमंत्र्यांना काल आणि आज पत्र पाठविले. माजी खासदार नरेश पुगलियांनीही पत्रव्यवहार केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून जनतेच्या जिवाशी खेळण्याचे पाप जिल्ह्यातील काही नेते करीत आहेत. या नेत्यांच्या कारस्थानाला आपण आणि महसूलमंत्री बळी पडले आहात. जिल्ह्यातून कोरोनाचे संकट संपल्यानंतर डॉ. खेमनारांची बदली करा, अशी विनंती पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

सविस्तर वाचा - मेळघाटात दिसतोय लुप्त होत चाललेला रानपिंगळा, पक्षीप्रेमींना आनंद

जनविकास सेनेचे आंदोलन
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या बदलीच्या निषेधार्थ जनविकास सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कोरोनाचे संकट असताना बदली करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांची बदली तत्काळ रद्द करण्यात यावी,अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केले.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com