गुराख्यांनो, जनावरे चारण्यासाठी जंगलात जाऊ नका; एकाच दिवशी दोन गुराखी ठार 

श्रीकांत पशेट्टीवार 
Thursday, 15 October 2020

मृताचे नाव उमाजी कुसन म्हस्के (वय ६६, रा. हळदा) असे आहे. तसेच दुसऱ्या घटनेत वरोरा तालुक्‍यातील बेबला येथे रानडुकराच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाला. शत्रुघ्न धर्मा गेडाम (वय ५४) असे मृताचे नाव आहे. या दोन्ही घटना आज, गुरुवारी उघडकीस आल्या.

चंद्रपूर ः गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. ब्रह्मपुरी वनविभागातील आवळगाव क्षेत्रात जनावरे चराईसाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले.

मृताचे नाव उमाजी कुसन म्हस्के (वय ६६, रा. हळदा) असे आहे. तसेच दुसऱ्या घटनेत वरोरा तालुक्‍यातील बेबला येथे रानडुकराच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाला. शत्रुघ्न धर्मा गेडाम (वय ५४) असे मृताचे नाव आहे. या दोन्ही घटना आज, गुरुवारी उघडकीस आल्या.

ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत दक्षिण वनपरिक्षेत्रात आवळगाव नियत क्षेत्र येते. याला लागूनच असलेल्या हळदा या गावातील उमाजी म्हस्के बुधवारी (ता. १४) जनावरे चारण्यासाठी जंगलात घेऊन गेले. सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे घरच्यांनी रात्री शोधाशोध केली. मात्र, रात्र बरीच झाली असल्याने त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे रात्रीच वनविभागाला याची माहिती देण्यात आली. रात्री वनविभागाने शोधमोहीम राबविली. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. 

ठळक बातमी - मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल

आज, गुरुवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला. सकाळी सात वाजता आवळगाव येथील कक्ष क्रमांक ११४२ परिसरात उमाजीचा मृतदेह आढळून आला. वनविभागाचे अधिकारी पूनम ब्राम्हणे, एल. एस. शहा यांनी घटनास्थळी भेट दिली. वनविभागाने मृताच्या कुटुंबीयांना तत्काळ २० हजार रुपयांची मदत दिली.

दुसरी घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत घडली. जवळीलच बेबला येथील गुराखी शत्रुघ्न गेडाम हे बुधवारी (ता. १४) सकाळी बकऱ्या चारण्यासाठी वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक २६५ परिसरात गेले. मात्र, सायंकाळी ते घरी परतलेच नाही. त्यामुळे रात्री घरच्या लोकांनी गावकऱ्यांच्या मदतीने गावालगत शोध घेतला. मात्र, रात्र झाल्याने जंगलात जाणे शक्‍य झाले नाही. 

सविस्तर वाचा - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

त्यामुळे आज, गुरुवारी सकाळी निमढेला उपक्षेत्राचे वनरक्षक व्ही. डी. सोनुने आणि गावकऱ्यांनी जंगलात शोधमोहीम राबविली. तेव्हा शत्रुघ्न गेडाम यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी के. डब्लू. धानकुटे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. ताडोबा कोअर झोन प्रकल्पातर्फे तातडीची मदत म्हणून मृताच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपये देण्यात आले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two cowboys are no more due to attack of wild animals