नागपूर जिल्ह्यात भिंत कोसळून दोघांचा दबून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

- महिला गंभीर जखमी 
- सावनेर तालुक्‍यातील बोरूजवादा येथील घटना 
- पावसामुळे कमकुवत झाली भिंत 
- घटनास्थळावर गावकऱ्यांनी एकच गर्दी 

सावनेर (जि. नागपूर) : जुनी भिंत शिकस्त झाल्याने शनिवारी (ता. 2) सकाळी 6.25 वाजताच्या सुमारास पडली. भिंतीखाली आल्याने दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. ही घटना सावनेर तालुक्‍यातील बोरूजवादा येथे घडली. सुरेश रामकृष्ण करनकार (40) व अतुल शिवराम उईके (17, रा. बोरुजवाडा) अशी मृतांची नावे आहे तर अतुलची आई उर्मिला शिवराम उईके (43) या गंभीर जखमी झाल्या आहे. 

उर्मिला उईके या मुलगा अतुलसह 10 वर्षांपासून बोरुजवाडा येथे भाड्याने राहत होते. बाजूला असलेल्या घराची भिंत पावसाळ्यानंतरही सुरू असलेल्या पावसामुळे कमकुवत झाली होती. शनिवारी सकाळी ही भिंत उईके यांच्या घरावर कोसळली. भिंत कोसळली तेव्हा सुरेश करनकार, आई उर्मिला उईके व मुलगा अतुल हे झोपले होते. भिंत टिनावर कोसळून तिघांच्या अंगावर पडली. यात सुरेश व अतुल यांचा मृत्यू झाला. तर उर्मिला गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती गावात काही क्षणातच वाऱ्यासारखी पसरली. यामुळे घटनास्थळावर गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. 

माहिती मिळताच सावनेर पोलिस ठाण्याचे एएसआय अनिल तिवारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावनेर येथील रुग्णालयात पाठविला. उर्मिला यांना गंभीर दुखातप झाली असून, त्यांना उपचारासाठी नागपुरातील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत मोल मजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करीत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two dead in wall collapse at Nagpur district