एक आत्महत्या आणि एक हार्ट अटॅक! एकाच दिवशी विलगीकरण केंद्रात दोन मृत्यू?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

चंद्रपूरातील एका विलगीकरण केंद्रात एकाच दिवशी दोन व्यक्‍तींचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाल्याने प्रशासन आणि नागरिक दोघेही हादरले आहेत. एका तीस वर्षीय युवकाने इथे आत्महत्या केली तर दुसऱ्या साठ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याचे कळते.

चंद्रपूर : कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी संशयितांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. मात्र इथे सुद्धा मृत्यू पाठ सोडत नाही, असे दिसते. चंद्रपूरातील एका विलगीकरण केंद्रात एकाच दिवशी दोन व्यक्‍तींचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाल्याने प्रशासन आणि नागरिक दोघेही हादरले आहेत. एका तीस वर्षीय युवकाने इथे आत्महत्या केली तर दुसऱ्या साठ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याचे कळते.
पोलिस आणि कुटुंबीयांसाठी बेपत्ता असलेल्या एका युवकाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विलगीकरण केंद्रात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (ता.30)उजेडात आली. विशेष म्हणजे याच केंद्रात एका वृद्धाचा हदयविकाराने मृत्यू झाला. या दोन्ही घटना (ता. 30) शनिवारी पहाटे घडल्या.
मिथून सरकार (वय 30) असे मृतक युवकाचे नाव आहे. तो चंद्रपुरातील शामनगर येथील रहिवासी आहे. तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी एका आठवड्यापूर्वी शहरातील रामनगर पोलिस ठाण्यात केली होती. दुसरीकडे मिथून टाळेबंदी आणि जिल्हाबंदी असतानाही एका ट्रकमध्ये बसून नागपूरला गेला. काही दिवस तिथे राहिल्यानंतर 23 मे ला लपूनछपून चंद्रपुरात परत आला. यावेळीही त्याने ट्रकचाच आसरा घेतला. परंतु नाकाबंदीवर ट्रक तपासताना तो पोलिसांच्या हाती लागला. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. तेव्हापासून तो तिथेच होता. दरम्यान शनिवारी रात्री त्याने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मिथूनच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर आणखी एकाचा मृतदेह याच विलगीकरण केंद्रात आढळला. संतोष निकोडे (वय 60) या वृद्धाला हदयविकाराचा झटका आला

सविस्तर वाचा - काय सांगता...! लॉकडाऊननंतर असं बदललं देहव्यापाराचं गणित

आणि त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. एकाच रात्री एकाच विलगीकरण केंद्रातील या दोन घटनांनी प्रशासन पुरते हादरले आहे. निकोडे मुळचे वणी तालुक्‍यातील आहे. ते मध्यप्रदेश येथे आपल्या नातेवाईंकांकडे गेले होते. परतत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि 23 मे पासून ते या विलगीकरण केंद्रात होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two death in quarntine center