मौदा तालुक्‍यात दोन शेतकरी आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

अरोली/मौदा (जि.नागपूर) : मौदा तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नंदापुरी येथील शेतकरी शेखर बळीराम मलेवार (वय 45) व केशव रघुनाथ निमकर (वय 55, रा. अरोली) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. 

अरोली/मौदा (जि.नागपूर) : मौदा तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नंदापुरी येथील शेतकरी शेखर बळीराम मलेवार (वय 45) व केशव रघुनाथ निमकर (वय 55, रा. अरोली) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. 
आरोली येथील केशव रघुनाथ निमकर यांनी रविवारी (ता.11) सकाळी दहा वाजता शेतामध्ये विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांचा मुलगा व पुतण्या शेतात गेले असता त्याच्या तोंडाला फेस आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित भंडारा येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी (ता.14) दोन वाजता त्यांचे निधन झाले. केशव यांच्याकडे तीन एकर वडिलोपार्जित शेती असून त्यांच्यावर युको बॅंक शाखा अरोलीचे दोन लाख 80 हजार रुपये इतके कर्ज होते. इतरही खासगी कर्ज होते. मागील काही वर्षांपासून व यावर्षीही व्यवस्थित पाऊस नसल्याने ते हतबल झाले होते. त्याच काळजीने ते नेहमी अस्वस्थ असायचे. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी आत्महत्या केली असावी, असे समजते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व 2 मुले असा परिवार आहे. त्यातील एक मुलगा मूकबधिर आहे. केशवच्या परिवाराला शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
नंदापुरी येथील शेतकरी शेखर बळीराम मलेवार यांणी मंगळवारी सकाळी घरीच विषारी औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांचा उपचारादरम्यान आज बुधवारी मृत्यू झाला. शेखर यांच्या जवळ सुमारे चार एकर शेती आहे. त्यांनी ठेक्‍याने 10 एकर शेती केली. पाऊस एकाच वेळेस आल्यामुळे सर्वांनी धान रोवणची सुरुवात केली. त्यामुळे याला धान रोवणी करिता मजूर मिळाले नाही. आपली शेती पडित राहील या तणावात त्यांनी विष घेतले. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आज रात्री नंदापुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two farmers commit suicide in Mauda taluka