वर्धा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

वर्धा - कष्ट उपसूनही नापिकीचे चक्र, शेतमालाला रास्त भाव न मिळणे आणि कर्जाच्या फेऱ्यात अडकून होणारी घुसमट थांबत नसल्याने हताश झालेल्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी सहपरिवार आत्महत्या केल्याच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त शासकीय धोरणांचा निषेध करण्यासाठी ज्या दिवशी सामाजिक संघटनांनी अन्नत्याग आंदोलन केले, त्याच दिवशी रविवारी (ता. १९) या दोन शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला. 

पांडुरंग माणिकराव टोपले (वय ४७) रा. भालेवाडी (ता. कारंजा) यांनी शेतात विष घेऊन, तर पांडुरंग चिंतामण पारिसे (वय २५) रा. कांदेगाव (ता. देवळी) या तरुण शेतकऱ्याने काकाच्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पांडुरंग पारिसे याचे येत्या १७ एप्रिलला लग्न होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्याने शेतीतील अपयशाला कंटाळून जगाचा निरोप घेतला. 

भालेवाडी (ता. कारंजा) येथील रहिवासी पांडुरंग टोपले यांच्याकडे केवळ दोन एकर शेती. त्यांनी शनिवारी (ता. १८) दुपारी चारदरम्यान शेतात विष घेतले. हे लक्षात येताच त्यांना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण प्रकृती पाहता त्यांना नागपूर मेडिकलला हलविण्यात आले. तिथे त्यांचे रविवारी (ता. १९) उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुले आहेत.  

 पांडुरंग पारिसे याने कांदेगाव शिवारात गावालगतच असलेल्या काकांच्या शेतातील बाभळीला गळफास घेऊन आत्महत्या केली.  आज सकाळी काही ग्रामस्थांना त्याचा मृतदेह बाभळीच्या झाडाला अडकलेला दिसला.  

युवा शेतकऱ्याची आत्महत्या चटका देणारी
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात आता युवा शेतकरीही त्याच मार्गाने जात असल्याचे दुःखदायक चित्र समोर येत आहे. कांदेगाव येथील पांडरंग पारिसे या २५ वर्षांच्या युवा शेतकऱ्याची आत्महत्या चटका लावणारी आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या १७ एप्रिलला त्याचे लग्न होणार होते. भविष्यात आपण संसाराची जबाबदारी पेलवू शकणार नाही, या चिंतेने त्यांनी आत्महत्या केली.

Web Title: Two farmers committed suicide in Wardha district