विदर्भात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

अवकाळी पाऊस आणि कर्जाच्या चिंतेमुळे हैराण झालेल्या विदर्भातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (ता. 29) उघडकीस आले. मृतांत अमरावती, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

अमरावती : वलगाव येथील कर्जबाजारी शेतकऱ्याचे स्वत:च्या घरात नापिकी व अल्प उत्पन्नामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. नंदकिशोर रामदास निर्मळ (वय 45, रा. वलगाव) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. 29) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. श्री. निर्मळ यांच्याकडे दोन एकर शेती असून, बॅंकेचे हजारो रुपयांचे कर्जही थकीत आहेत.

द्विधा मन:स्थिती

त्यामुळे ते काही दिवसांपासून द्विधा मन:स्थितीत असल्यामुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती मृत शेतकऱ्याचे भाऊ श्‍याम रामदास निर्मळ (वय 47) यांनी दिल्याचे वलगाव पोलिसांनी सांगितले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.

शेतकऱ्याने घेतला गळफास

केशोरी (जि. गोंदिया) : शेतातील झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. 29) दुपारी तुकुम सायगाव येथे उघडकीस आली. मुन्ना लोगडे (वय 42, रा. तुकुम सायगाव) असे मृताचे नाव आहे. 

बॅंकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे

लोगडे यांच्याकडे सहा एकर शेती आहे. परंतु, यंदा अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि रोगाने उत्पादनात घट झाली. त्यामुळे ते बॅंकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत होते. अशातच त्यांनी घरामागे असलेल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्यावर अडीच लाख रुपये कर्ज असल्याची माहिती आहे. 

शेतकरीपुत्राची आत्महत्या 

अंबाडा (जि. अमरावती) : मोर्शी तालुक्‍यातील अंबाडा गावातील स्वप्नील मधुकरराव घावट (वय 23) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. 
स्वप्नीलच्या वडिलाजवळ अर्धा एकर कोरडवाहू शेती आहे. त्यामुळे यातून स्वप्नीलला फारसे काही उत्पन्न होत नव्हते. तो मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवीत होता.

एवढ्यातही भागात नसल्यामुळे तो रोजगाराच्या शोधात सूरतमध्ये गेला. तेथे एका खासगी कंपनीत काम करीत होता. मात्र, कंपनीने दोन महिन्यांचा पगारच दिला नाही. त्यामुळे त्याला गावाकडे परत येण्याकरिता घरच्यांनी तिकिटाचे पैसे पाठविले. स्वप्नील एकुलता एक असल्याने त्याने गावातच रोजगार शोधावा, अशी वडिलांची इच्छा होती.

पुढील महिन्यात होते लग्न

दोन वर्षांपूर्वी त्याच्या बहिणीचे लग्न झाले. आता त्याचेही लग्न जुळले होते व साखरपुडाही झाला होता. पुढील महिन्यात लग्नाची तारीखही निश्‍चित झाली होती. मात्र, त्या अगोदरच स्वप्नीलने आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. बचतगट व खासगी कर्जाने चिंताग्रस्त असलेल्या स्वप्नीलने नैराश्‍यातून हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two farmers ended their life in Vidarbha