महिनाभराचा पाऊस दोन तासांत!

file photo
file photo

नागपूर  : हवामान विभागाने यंदा विदर्भासह संपूर्ण देशात सरासरी पावसाची शक्‍यता वर्तविली असली तरी, आतापर्यंत मॉन्सूनने वैदर्भींची घोर निराशा केली आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर काल, रविवारी अखेरच्या दिवशी रात्री दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागरणासह काढावी लागली. अनेक रस्त्यांवर झाडे पडली तर रस्ते, चौकांत पाणी साचल्याने ड्रेनेज लाइन स्वच्छतेचा मनपाचा दावाही फोल ठरला. काल, 30 जूनच्या रात्री 75.4 मिलिमीटर पाऊस पडला. उल्लेखनीय म्हणजे, महिनाभरात जेवढा पाऊस झाला, तेवढाच पाऊस अवघ्या दोन तासांत बरसला. रात्री दोन तास मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले. नागरिकांच्या घरांतही पाणी शिरले तसेच झाडे पडल्याचे अग्निशमन व आणीबाणी विभागाने नमूद केले. याशिवाय शहरातील चौक, रस्त्यांतही गुडघाभर पाणी साचले. यात पडोळेनगर चौक, नरेंद्रनगर पुलाखाली, ग्रेट नाग रोड, मेडिकल चौकात पाणी साचले. शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला असलेल्या ड्रेनेज नाल्या स्वच्छ न केल्याचेही यानिमित्त उघडकीस आले. त्यामुळे पावसाळी पूर्वतयारी केवळ कागदावरच केल्याचे चित्र आहे. गांधी गेट, अत्तर ओळ, रेशीमबाग येथील गिल्लूरकर हॉस्पिटलमागील वस्ती, आझमशहा चौक, उत्तर नागपुरातील भीम चौकातील बुद्धविहार, नरेंद्रनगर येथील ऊर्वेला कॉलनीमधील घरांत पाणी शिरले. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मानेवाडा रोडवरील रक्षण किराणाजवळ, किंग्जवेवर झाडे पडली. किंग्जवेवर झाड पडल्याने एका बाजूने वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे सकाळी वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.मुसळधार पावसामुळे मोहनगरातील ताटेवार बिल्डिंगची संरक्षक भिंत कोसळली. वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर पाणी साचले. आणीबाणी विभागाच्या जवानांनी पाइपमधील कचरा काढल्याने पूल पूर्ववत झाला.महालक्ष्मीनगर येथील ट्रान्सफॉर्मर बंद पडले. श्रीनगरमध्ये वीजतारांवर झाड पडल्याने वीजखांब वाकला. ग्रेट नाग रोडवरील सिरसपेठ, गौरखेडे ले-आउट येथेही वीजवाहिनीवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्‌टा पश्‍चिमोत्तर भारताकडे सरकत असून, पुढील 2-3 दिवसांत आणखी तीव्र होईल. त्यामुळे नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 146.7 मिलिमीटर पाऊस झालेला आहे. यात 30 जूनच्या रात्री झालेल्या 75.4 मिलिमीटरचा समावेश आहे. जिल्ह्यात सरासरी 166.3 मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे जूनमध्ये विदर्भात सरासरी 170.6 मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु, यावर्षी 1 ते 30 जूनपर्यंत केवळ 90.1 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, जो सरासरीच्या 47 टक्‍के कमी पाऊस आहे.मागील काही वर्षांतील आकडेवारीवर कटाक्ष टाकल्यास, 1 जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यांत विदर्भात सरासरी 955 मिलिमीटर पाऊस पडला. मात्र, जूनमधील स्थितीमुळे यावर्षी पाऊस सरासरी गाठेल की नाही, याबाबत शंका आहे.
काटोल, नरखेडमध्ये अतिवृष्टी
नागपूर जिल्ह्यात रविवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. दुष्काळग्रस्त काटोल व नरखेड तालुक्‍यातील चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. नरखेड तालुक्‍यात 415 मिमी तर काटोल तालुक्‍यात 370 मिमी पाऊस झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com