चौरासमधील अडीचशे हेक्‍टर शेती जलमय

लाखांदूर : पावसाचे पाणी बाहेर जाण्यास मार्ग नसल्याने जलमय झालेली शेती
लाखांदूर : पावसाचे पाणी बाहेर जाण्यास मार्ग नसल्याने जलमय झालेली शेती

लाखांदूर, (भंडारा): पावसाळ्यात डोळ्यात प्राण आणून शेतकरी पावसाची वाट पाहतात. परंतु, चौरास भागातील शेतकरी मात्र, याला अपवाद आहे. पावसाळ्यात त्यांना धडकी भरते. गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे सदोष बांधकाम झाल्याने गोसेचे बॅकवॉटर (पार्श्‍वजल) शेतात साचून राहते. तब्बल 31 गावातील अडीचशे हेक्‍टर शेतजमिन या पाण्याखाली असल्याने त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. तब्बल 14 वर्षांपासून भोगाव्या लागणाऱ्या यातनांचा अंत कधी होणार असा प्रश्‍न त्यांनी लोकप्रतिनिधी व सरकारला केला आहे.
गोसेखुर्द धरणाचा डावा कालवा पवनी व लाखांदूर तालुक्‍यातील 61 गावाच्या शेतशिवारातून गेला आहे. डाव्या कालव्याचे बांधकाम मागील 2005ला सुरू झाले; अद्याप हे बांधकाम अपूर्णच आहे. शेतामधील पावसाचे पाणी नदी व नाल्यांत वाहून नेण्याचे काम जुन्या काळापासून पाट करीत होते. परंतु, कालव्याचे बांधकाम करताना नैसर्गिक प्रवाह असणारे हे पाट बुजविण्यात आले. त्यावर सिडीवर्क न करताच सरळसरळ बांधकाम करण्यात आले. त्यामुळे चौरास भागात शेतामध्ये साचलेले पावसाचे पाणी बाहेर नदी,नाल्यांत जाण्याचा मार्गच बंद झाला. आता पावसाचे पाणी शेतातच साचून राहते. या पाण्याचा निचरा होण्यास एक ते सव्वा महिन्यांचा कालावधी लागतो. दरम्यान
शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेता येत नाही. पीक घेतल्यास पावसाचे दीर्घकाळ साचून राहिल्याने धानाची रोपे सडून जातात. पवनी तालुक्‍यातील सेंद्री ते लाखांदूर तालुक्‍यातील खैरणा शेतशिवारापर्यंत 22 किमीपर्यंत डावा कालव्याचे बांधकाम झाले आहे. मागील महिन्यात पाऊस नसल्याने या कालव्यातून चौरास भागातील शेतकऱ्यांना पाणी पुरविण्यात आले. काही प्रमाणात शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. मात्र, गेल्या चार दिवसांपासूनच्या संततधार पावसाचे पाणी शेतात साचल्याने शेतीला तलावांचे रूप आले. पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत असून तब्बल एक ते दीड महिना व पाऊस आल्यास त्याहीपेक्षा अधिक काळ पाणी साचल्याने
शेतकरी हतबल झाला आहे.

चौदा वर्षांचा वनवास
गेल्या 14 वर्षांपासून शेतकरी हा त्रास भोगत आहेत. कालव्याचे बांधकाम करताना झालेल्या चुकीचा परिणाम त्यांना नाहक सोसावा लागत आहे. आजपर्यंत सातत्याने लोकप्रतिनिधी, गोसेखुर्द धरण विभागाचे अधिकारी, आयुक्त सर्वांकडे तक्रारी करण्यात आला. परंतु, कोणालाही पाझर फुटला नाही. रोहणी, किरमटी, गवराळा, विरली बु., ईटान, नांदेड, करांडला, ओपारा, राजनी, सरांडी, डोकेसरांडी ,पाहुणगाव ,परसोडी ,भागडी ,दोनाड, खैरणा, मोहरना, कुडेगाव, गवराळा,डांभेविरली, सावरगाव, मांदेड, असोला, आतली आदी गावातील शेतकरी
निसर्गाच्या नव्हे तर सुलतानी प्रकोपाचे बळी ठरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com