नागपूर रेल्वेस्थानक विकासाचा आराखडा दोनशे कोटींचा! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. या स्थानकाला वर्ल्डक्‍लास चेहरा मिळवून देण्यासाठी दोनशे कोटींचा आराखडा तयार केला आहे.

नागपूर - नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. या स्थानकाला वर्ल्डक्‍लास चेहरा मिळवून देण्यासाठी दोनशे कोटींचा आराखडा तयार केला आहे. आराखड्याची सविस्तर माहिती निविदाकारांपुढे मांडण्यासाठी बुधवारी (ता. 22) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे देशातील महत्त्वपूर्ण 50 रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. विमानतळ विकासाच्या धर्तीवर विकासकांच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. पुनर्विकास होणाऱ्या स्थानकांमध्ये नागपूरचाही समावेश आहे. त्यासाठी यापूर्वीच निविदाही मागविण्यात आल्या. परंतु, अटी आणि शर्ती अडचणीच्या असल्याने इच्छुक पुढे आले नाहीत. निविदाकारांच्या मागणीनुसार अटी-शर्तीमध्ये बदल केला आहे. त्यात लीजचा कालावधी वाढविण्यासह वाणिज्यिक वापरासाठी पोट कंत्राटदाराच्या नियुक्तीचीही परवानगी देण्यात आली. सुधारित अटींमुळे आतातरी इच्छुक पुढे येतील, अशी अपेक्षा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी नागपूर भेटीप्रसंगी व्यक्त केली होती. 

आयआरएसडीसीएने या प्रकल्पाला चालना देण्याच्या दृष्टीने फ्रान्सच्या इनिया कंपनीकडून प्राथमिक आराखडा तयार करून घेतला असून, प्रकल्पावर दोनशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यात 2041 पर्यंतचा विचार केला आहे. त्यावेळी नागपूर स्थानकावरून 2.19 लाख प्रवाशांची वर्दळ गृहीत धरली आहे. रेल्वेस्थानकाला आकर्षक रूप देणे, फलाटांची संख्या आणि सुविधेत वाढ, मेट्रोशी जोडणी, वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग सुविधांचा आराखड्यात समावेश केला आहे. 

तीन टप्प्यांमध्ये विकासकामे 
तीन टप्प्यांमध्ये विकासकामे अपेक्षित असून, कार्यादेशानंतर तीन वर्षांत बांधकाम पूर्ण होईल आणि पूर्ण क्षमतेने व्यावसायिक विकासासाठी आठ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. रेल्वेसाठी आवश्‍यक असणारी जागा सोडून अन्य भागाचा वाणिज्यिक वापर गुंतवणूकदारांना करता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred crores for the development of Nagpur railway station