गोंदिया: प्रशिक्षणार्थी विमानाला अपघात; 2 पायलट ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

प्रशिक्षक रंजन गुप्ता (वय 38) व प्रशिक्षणार्थी हिमानी (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. बिरसी येथील विमानतळावरून प्रशिक्षणार्थी वैमानिकाने वरिष्ठ पायलटसोबत उड्डाण घेतले. प्रशिक्षणादरम्यान गोंदियापासून पश्‍चिमेला असलेल्या देवरी (रायपूर) जवळील घोडीटोला-लावणी गावाच्या मध्ये असलेल्या नदीपात्रात हे विमान कोसळले.

गोंदिया - बिरसी विमानतळाच्या राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमानाला झालेल्या अपघातात दोन पायलट जागीच ठार झाले. ही घटना आज (बुधवारी) सकाळी 9 वाजताच्या सुमारास देवरी (रायपूर) जवळील घोटीटोला-लावणीच्या मध्ये असलेल्या नदीपात्रात घडली. 

प्रशिक्षक रंजन गुप्ता (वय 38) व प्रशिक्षणार्थी हिमानी (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. बिरसी येथील विमानतळावरून प्रशिक्षणार्थी वैमानिकाने वरिष्ठ पायलटसोबत उड्डाण घेतले. प्रशिक्षणादरम्यान गोंदियापासून पश्‍चिमेला असलेल्या देवरी (रायपूर) जवळील घोडीटोला-लावणी गावाच्या मध्ये असलेल्या नदीपात्रात हे विमान कोसळले. विमान कोसळल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली.

विमानात अचानक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. सावधगिरी बाळगत ते विमान उतरविण्याच्या प्रयत्न करीत असतानाच देवरीजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीकिनाऱ्यावर असलेल्या सरीता जलमापन केंद्राच्या तारेला आदळल्यानंतर सदर विमान नदीतील डोंग्याला आदळला. यात वरिष्ठ पायलट रंजन गुप्ता व प्रशिक्षणार्थी पायलट हिमानी (वय 20) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात विमानाचे अक्षरश: तुकडे झाले.

Web Title: Two Killed As Training Aircraft Crashes In Gondia