प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

गोंदिया -बिरसी राजीव गांधी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान देवरी (रायपूर) गावाजवळील वैनगंगा नदीच्या पात्रात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास कोसळले. या अपघातात दोन वैमानिक जागीच ठार झाले. विमानाचे एक इंजिन बंद पडल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. रंजन आर. गुप्ता (वय 38) व हिमानी गुरुदयाल सिंग (24, रा. दिल्ली) अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. या अपघाताच्या चौकशीचा आदेश भारतीय विमान प्राधिकरणाने दिला. 

गोंदिया -बिरसी राजीव गांधी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान देवरी (रायपूर) गावाजवळील वैनगंगा नदीच्या पात्रात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास कोसळले. या अपघातात दोन वैमानिक जागीच ठार झाले. विमानाचे एक इंजिन बंद पडल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. रंजन आर. गुप्ता (वय 38) व हिमानी गुरुदयाल सिंग (24, रा. दिल्ली) अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. या अपघाताच्या चौकशीचा आदेश भारतीय विमान प्राधिकरणाने दिला. 

गोंदियालगत असलेल्या बिरसी येथे राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात 18 प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे प्रशिक्षण घेत आहेत. आज सकाळी नऊच्या सुमारास डी. ए. 42 क्रमांकाच्या प्रशिक्षणार्थी विमानाने उड्डाण केले. या विमानात वरिष्ठ वैमानिक रंजन गुप्ता व प्रशिक्षणार्थी वैमानिक हिमानी सिंग हे होते. गोंदियापासून पश्‍चिमेला 20 किलोमीटर अंतरावरील देवरी (रायपूर) या गावाजवळ या विमानाने तीन वेळा घिरट्या घातल्या. याचदरम्यान, देवरी (रायपूर) व मध्य प्रदेशातील लावणी या गावाच्या दरम्यान असलेल्या उच्च दाबाच्या वीजतारांना विमान धडकले. त्यामुळे विमानाचे दोनपैकी एक इंजिन बंद पडले. इंजिन बंद पडल्याने रंजन गुप्ता यांनी विमान उतरविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात त्यांना यश आले नाही व विमान देवरीनजीक वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या घोटीटोला-लावणीच्या पात्रात कोसळले. 

या घटनेत विमानाचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले होते. वरिष्ठ पायलट रंजन गुप्ता व प्रशिक्षणार्थी पायलट हिमानी सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळ देवरी (ता. गोंदिया) हे दोन राज्यांच्या सीमेवर असून, वैनगंगा नदीच्या पलीकडे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा आहे. विमान कोसळताना झालेल्या आवाजामुळे हादरलेल्या गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली. जलमापन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती देऊन मदतकार्याला सुरवात केली. अपघातग्रस्त विमानाची पाहणी करून बिरसी विमान प्राधिकरणाने चौकशीचा आदेश दिला आहे. दुपारनंतर दिल्ली येथील भारतीय विमान प्राधिकरणाचा चमू घटनास्थळी दाखल झाला. त्याने घटनेची चौकशी केली आहे. रंजन गुप्ता हे सहा महिन्यांपूर्वी, तर हिमानी सिंग ही साडेचार महिन्यांपूर्वी प्रशिक्षण केंद्रात रुजू झाले होती. 

वर्षभरातील दुसरी घटना 

बिरसी विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षणार्थी विमानाला वर्षभरापूर्वी अपघात झाला होता. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. तसेच दीड महिन्यापूर्वी येथील दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उड्डाण घेणारे प्रशिक्षणार्थी विमान व त्याच्या देखभालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दुर्घटनाग्रस्त विमान चार आसनी होते. 

Web Title: two killed training aircraft crashes gondia