मलब्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू

file photo
file photo

गोंदिया : गोंदिया-बालाघाट रेल्वेमार्गावर पाइप व केबल टाकण्याचे काम करीत असताना माती खचल्याने त्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला; तर एक मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. 23) सायंकाळी पाचच्या सुमारास येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर घडली.
राजेश देवलाल शरणागत (वय 35), अंकर पंधरवार (वय 35, रा. शिवनी, रावणवाडी) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत चंद्रविलास शहारे (वय 25, रा. लहीटोला) हा मजूर जखमी झाला.
येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकपासून काही अंतरावर रुळाखाली पाइप व केबल टाकण्याचे काम सुरू होते. या कामावर चार मजूर कार्यरत होते. मात्र, शेजारच्या रुळावरून रेल्वेगाडी गेल्याने जमिनीत कंपण झाले आणि रुळाखाली पॉइंट टाकण्यासाठी जागा बनविण्यासाठी असलेले मजूर त्या माती व गिट्टीखाली दबले. यात राजेश शरणागत व अंकर पंधरवार जागीच ठार झाले. चंद्रविलास शहारे हा गंभीर जखमी झाला. त्यांच्यासोबत काम करीत असलेला चौथा मजूर सुदैवाने बचावला. त्यानेच याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली.
दरम्यान, या घटनेमुळे गोंदिया रेल्वेस्थानकावर काहीकाळ गोंधळ उडाला होता. रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. जखमी मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कामाचे कंत्राट रेल्वेने भगवती कंस्ट्रक्‍शन कंपनीला दिले आहे. घनश्‍याम प्रमर यांची ही कंपनी असल्याचे सांगितले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com