दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नागपूर  ः वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातून 2 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. पहिली घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. आझादनगर, गिट्टीखदान निवासी संतोष शंकर बुरबुरे (40) यांचा 17 वर्षीय मुलगा समीर अचानक बेपत्ता झाला. मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा कळंब (यवतमाळ) येथे राहणाऱ्या आपल्या आजीकडे राहतो. 30 ऑगस्टला दुपारी सव्वाच्या सुमारास तो पाटणकर चौक (जरीपटका) येथील बालन्यायालयात साक्ष देण्यासाठी नागपूरला आला. बुरबुरे त्याला घेऊन बालन्यायालयात आले असता माहिती मिळाली की, शासकीय सुटी असल्याने न्यायालय बंद आहे.

नागपूर  ः वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातून 2 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. पहिली घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. आझादनगर, गिट्टीखदान निवासी संतोष शंकर बुरबुरे (40) यांचा 17 वर्षीय मुलगा समीर अचानक बेपत्ता झाला. मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा कळंब (यवतमाळ) येथे राहणाऱ्या आपल्या आजीकडे राहतो. 30 ऑगस्टला दुपारी सव्वाच्या सुमारास तो पाटणकर चौक (जरीपटका) येथील बालन्यायालयात साक्ष देण्यासाठी नागपूरला आला. बुरबुरे त्याला घेऊन बालन्यायालयात आले असता माहिती मिळाली की, शासकीय सुटी असल्याने न्यायालय बंद आहे. यामुळे बुरबुरे यांनी समीरला परत आजीकडे जाण्यास सांगून त्याच्याकडे 4,200 रुपये दिले. तसेच गणेशपेठ मध्यवर्ती स्थानकावरून त्याला नागपूर-धारंजी बसमध्ये बसवून दिले आणि घरी परतले. मुलगा आजीकडे असल्याचे समजून बुरबुरे निश्‍चिंत होते. दरम्यान, त्यांना माहिती मिळाली की, समीर आजीकडे पोहोचलाच नाही. त्यांनी नातेवाइकांसह सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो कुठेही आढळला नाही. अखेर त्यांनी गणेशपेठ पोलिसांत तक्रार दाखल केली.
दुसरी घटना जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत घडली. मोबाईल दुरुस्तीसाठी गेलेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जरीपटका परिसरात राहणारी 17 वर्षीय मुलगी बराच वेळपासून कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे पाहून मोठ्या भावाने तिला रागावले. यामुळे ती संतापली आणि रागात मोबाईल जमिनीवर आदळला. राग शांत झाल्यावर तिच्या लक्षात आले की, जमिनीवर आदळल्याने मोबाईल बिघडला आहे. काही वेळाने ती मोबाईल दुरुस्तीसाठी जात असल्याचे सांगत घरातून निघाली आणि नंतर परतलीच नाही. चिंतित कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, ती सापडली नाही. कोणीतरी तिला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयातून कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित ठाण्यात अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two minors Kidnapped