अंबा एक्‍स्प्रेसला लागणार आणखी दोन कोच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अमरावती : पुढील काही दिवसांत 22 डब्यांची अंबा एक्‍स्प्रेस 24 डब्यांची होणार आहे. अंबा एक्‍स्प्रेसला नव्याने दोन कोच लागणार असल्याची माहिती भुसावळ विभागाच्या मंडळ प्रबंधकांनी रविवारी (ता. 11) अमरावती रेल्वेस्थानकाच्या भेटीदरम्यान दिली.

अमरावती : पुढील काही दिवसांत 22 डब्यांची अंबा एक्‍स्प्रेस 24 डब्यांची होणार आहे. अंबा एक्‍स्प्रेसला नव्याने दोन कोच लागणार असल्याची माहिती भुसावळ विभागाच्या मंडळ प्रबंधकांनी रविवारी (ता. 11) अमरावती रेल्वेस्थानकाच्या भेटीदरम्यान दिली.
अमरावतीमधील समस्यांवर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत असलेल्या खुल्या जागेवर अतिरिक्त डीआरएमचे कार्यालय सुरू करण्याची मागणी केली. यासोबतच भारताचा शंभर फुटी तिरंगा अमरावती रेल्वेस्थानकावर उभारला जाणार आहे. नवनीत राणांनी केलेल्या या मागणीला मंडळ प्रबंधकांनी लगेच हिरवी झेंडी दिली. आमदार डॉ. सुनील देशमुख म्हणाले की, अंबा एक्‍स्प्रेस सुरू झाली तेव्हापासून गाडी हाउसफुल्ल धावत आहे. लोकांचे वेटिंग आठ-आठ दिवस क्‍लिअर होत नाही. त्यामुळे या गाडीला आणखी दोन कोच लागल्यास अमरावतीकरांना त्याचा फायदा होईल. ही गाडी अमरावतीवरून सुटते. परंतु आरक्षणाचा कोटा भुसावळ विभागाला सर्वाधिक आहे. भुसावळपर्यंत गाडीत फारशी गर्दी राहत नाही. यामध्ये रेल्वेचे सर्वाधिक नुकसान आहे. त्यामुळे भुसावळचा कोटा कमी करावा किंवा रद्दच करून अमरावतीचा कोटा वाढवावा, अशी मागणी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी भुसावळ विभागाच्या मंडळ प्रबंधकांकडे केली. यासोबतच अमरावती ते पुणे गाडी नियमित करावी किंवा अमरावती-पुणे व्हाया मनमाड ही गाडी प्रत्येक गुरुवारी चालते. ती नियमित करण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी केल्या. तातडीच्या कामासाठी प्रवाशांना नागपूरला जाऊन विमानाने मुंबईला जावे लागते. त्यामुळे दुरांतो सुपरफास्ट एक्‍स्प्रेसला बडनेऱ्यात थांबा देण्याची मागणी त्यांनी रेटून धरली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more coaches will be joined to Amba Express