नळयोजनांच्या नावाने "चांगभलं! एकाच गावात दोन योजना

tap
tap

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. त्यातूनच अनेक गावांची तहान भागविली जाते. गेल्या काही वर्षांत विविध योजनांतून ग्रामपंचायतस्तरावरही स्वतंत्र नळयोजना झाल्या. आता अनेक गावांत दोन नळयोजना आहे. दोन्ही नळयोजनांच्या देखभाल दुरुस्तीवर दरवर्षी मोठा खर्च करण्यात येतो. हा खर्च विभागाला डोईजड होत असतानाच कंत्राटदारांचे मात्र चांगभलं होत आहे. ज्या गावांत अलीकडच्या काळात स्वतंत्र नळ योजना तयार झाल्या. त्यांची नावे प्रादेशिक नळयोजनेतून वगळण्याची मागणी आहे.
मात्र, त्या गावांची नावे वगळण्याबाबत विभागाची चालढकल सुरू आहे.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या ३३ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून अनेक गावांतील नागरिकांची तहान भागविली जाते. पाणीपट्टी वसुली नियमित नसली तरी आजवर या योजना विभाग कसेतरी चालवित होते. मात्र, गेल्या काही वर्षांत जलस्वराज्य प्रकल्पातून अनेक गावांत पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

स्वतंत्र नळ योजना अस्तित्वात आल्या. त्याचा परिणाम आता एकाच गावात दोन नळ योजना सुरू आहेत. पाणीपट्टीची वसूली करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आली आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायती पाणीपट्टी कर मिळाल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे त्याचा भरणा करीत नाही.

जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक नळ योजना आता जुन्या झाल्या आहेत. त्याच्या देखभाल दुरुस्तीवर दरवर्षी अंदाजपत्रकात मोठी तरतूद करण्यात येते. त्यातूनच प्रादेशिक नळयोजनांची देखभाल दुरुस्ती केली जाते.

ग्रामपंचायतीही आपल्या अखत्यारित असलेल्या नळयोजनांच्या देखभाल दुरुस्तीचा भार कित्येकदा जिल्हा परिषदेवर टाकते. देखभाल दुरुस्तीचा हा खर्च कंत्राटदारांच्या प्रेमापोटी विभाग गेल्या कित्येक वर्षांपासून उचलत आहे. यात जिल्हा परिषदेचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, हा प्रकार काही सदस्यांच्या लक्षात आला. त्यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत हा मुद्दा उचलून धरला.

ज्या गावात ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र नळ योजना आहे. सोबतच त्याच गावात प्रादेशिक नळयोजना असल्यास ती गावे वगळण्याची सूचना केली. मात्र, अजूनपर्यंत गावे वगळण्यात आली नाही. कंत्राटदारांच्या प्रेमापोटीच ही गावे वगळण्यात येत नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.

सविस्तर वाचा - पाहिलेत का कधी प्रेमाचे गाव?

कंत्राटदारांनी दिले पेटी कॉन्ट्रक्ट
प्रादेशिक नळयोजनांची कामे कंत्राटदार सांभाळतात. अनेक कंत्राटदारांनी पेटी कॉन्ट्रक्ट देऊन आपली कामे दुसऱ्यांना दिली आहेत. पेटी कॉन्ट्रक्ट देत येत नाही. मात्र,पेटी कॉन्ट्रक्ट देण्याचा प्रकारही ग्रामीण पाणीपुरवठा विभागात गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com