दोन जागा गेल्याच, भाजपच्या मतांनाही ओहोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

भाजपने या निवडणुकीत अत्याधुनिक प्रचार यंत्रणेचा वापर करीत महाजनादेश यात्रा काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेद्वारे नागपुरातील जनतेला जनादेश मागितला. संपूर्ण निवडणुकीच्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अभिनेता व खासदार रवी किशन, भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांच्यासह स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील सहाही मतदारसंघांत जोमात प्रचारसभा घेतल्या. मात्र, या प्रचारसभेतील जोश भाजपला मतदान करताना मतदारांत दिसून आला नसल्याचे आकडेवारीने स्पष्ट केले.

नागपूर : मोठ्या प्रमाणात प्रचारयंत्रणा, मोठ्या नेत्यांनी सभा गाजविल्यानंतरही भाजपला शहरात सहा जागा कायम ठेवण्यात अपयश आले. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 1 लाख 29 हजार मतांची घट झाली. त्या तुलनेत या निवडणुकीत "लो प्रोफाइल' प्रचार करणाऱ्या कॉंग्रेसच्या पारड्यात लोकसभेच्या तुलनेत 25 हजार मतांची भर पडली. विशेष म्हणजे पाच वर्षे राज्य केल्यानंतर विकासाचे दावे करणाऱ्या भाजपच्या मतांत मागील विधानसभेच्या तुलनेतही घट झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 
भाजपने या निवडणुकीत अत्याधुनिक प्रचार यंत्रणेचा वापर करीत महाजनादेश यात्रा काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेद्वारे नागपुरातील जनतेला जनादेश मागितला. संपूर्ण निवडणुकीच्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अभिनेता व खासदार रवी किशन, भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांच्यासह स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील सहाही मतदारसंघांत जोमात प्रचारसभा घेतल्या. मात्र, या प्रचारसभेतील जोश भाजपला मतदान करताना मतदारांत दिसून आला नसल्याचे आकडेवारीने स्पष्ट केले. शहरातील सहाही जागा जिंकण्याचा दावा निवडणुकीपूर्वी केला जात होता. या दाव्यालाही मतदारांनी छेद दिला. या निवडणुकीत भाजपला सहाही मतदारसंघात एकूण 5 लाख 16 हजार 272 मते पडली. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला शहरात 6 लाख 46 हजार 75 मते पडली होती. लोकसभेच्या तुलनेत चार महिन्यांमध्येच भाजपच्या मतांत 1 लाख 29 हजार 803 मतांनी घट झाल्याने भाजप नेतेही आश्‍चर्यात पडले आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत मतदारसंघनिहाय आघाडी एकाही आमदाराला कायम राखता आली नाही. पाच वर्षापूर्वी 2014 मध्ये भाजपलाही सहाही मतदारसंघात यशासह 5 लाख 37 हजार 208 मते पडली होती. गेल्या पाच वर्षांत शहरात अनेक विकासकामे झाली. मेट्रो रेल्वे, उड्डाणपूल, सिमेंट रस्ते झाले. विविध शैक्षणिक संस्था शहरात आल्या. त्यामुळे या निवडणुकीत मतांचा पाऊस पडणार, अशी भाजपची अपेक्षा होती. परंतु भाजपच्या अपेक्षांना सुरुंग लागला. मागील निवडणुकीच्या तुलनेत 20 हजार मतांची घट झाली. पाच वर्षांत सर्वच वाढले. परंतु भाजपची मते वाढण्याऐवजी कमी झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
कॉंग्रेसला लाभ 
या निवडणुकीत कॉंग्रेसला शहरातील दोन मतदारसंघातील यशासह एकूण 4 लाख 61 हजार 952 मते मिळाली. भाजपच्या तुलनेत प्रचारात कुठेही नसलेल्या कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 25 हजार मते अधिक घेतली. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला 4 लाख 36 हजार मते मिळाली होती. मागील 2014 मधील निवडणुकीच्या तुलनेत कॉंग्रेसच्या पारड्यात 1 लाख 58 मतांची वाढ झाली. मागील निवडणुकीत कॉंग्रेसला 3 लाख 3 हजार 78 मते पडली होती.
2014 व आता मिळालेली पक्षनिहाय मते 
वर्ष        पक्ष         मिळालेली मते 

2014    भाजप      5 लाख 37 हजार 208 
            कॉंग्रेस     3 लाख 3 हजार 78 
2019    भाजप      5 लाख 16 हजार 272 
            कॉंग्रेस     4 लाख 61 हजार 952


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two seats are gone