भरधाव टिप्परने दोन बहिणींना चिरडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

आंचलचा हट्ट नडला
लक्ष्मीला दुचाकी चालविता येत होती तर आंचल नुकतीच दुचाकी चालवणे शिकली होती. आंचलला नीट दुचाकी चालविता येत नसल्यामुळे लक्ष्मी तिला प्रशिक्षण देत होती. अशातच दूध घेऊन परत येताना आंचलने दुचाकी चालविण्याचा हट्‌ट केला. तो हट्टच दोघींच्याही जिवावर बेतला. दुकानासमोर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आंचलचा हट्‌ट स्पष्ट दिसत आहे.

नागपूर - दुचाकीने दूध आणण्यासाठी जाणाऱ्या दोन बहिणींना रेतीच्या भरधाव टिप्परने चिरडले. अपघात एवढा भीषण होता की दोघींचेही धडापासून पाय वेगळे झाले होते. ट्रकने दोघींना सुमारे दहा फूट फरपटत नेले. ही दुर्दैवी घटना आज बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पारडी नाका क्रमांक दोनजवळ घडली. लक्ष्मी रमाशंकर शाहू (वय २१, बीडगाव रोड, पारडी) आणि आंचल रमाशंकर शाहू (१९) अशी अपघातात ठार झालेल्या मुलींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींचे वडील रमाशंकर शाहू यांच्या घरी किराणा दुकान आहे. दुकान आईवडील सांभाळतात. परंतु, आई भावाच्या मुलीचे लग्न असल्यामुळे उटी येथे गेली होती. त्यामुळे दुकान सांभाळण्याची जबाबदारी आंचल आणि लक्ष्मीवर होती. त्यांना आर्यन नावाचा लहान भाऊ आहे. 

लक्ष्मी बारावीपर्यंत शिकलेली आहे तर आंचल ही बी. ए. द्वितीय वर्षात शिकत होती. शिक्षणासह दोघीही वडिलांना दुकान सांभाळण्यात मदत करायच्या. बुधवारी सकाळच्या सुमारास वडील किराणा दुकानात सामान भरण्याच्या उद्देशाने बाहेर गेले होते. तर दुकानात विक्रीसाठी लागणारे १० लिटर दूध आण्यासाठी दोघी बहिणी सकाळी ७ वाजता घरच्या (एमएच-४९, एझेड-९३३१) क्रमांकाच्या ॲक्‍टिव्हाने पारडी मार्गावर हनुमान मंदिर परिसरात गेल्या होत्या. 

दूध खरेदी करून रस्त्यावरून यू-टर्न घेऊन घरी परत येत असताना भंडाऱ्याकडून येणाऱ्या (एमएच-४०, एके-१००८) या रेतीने भरलेल्या टिप्परने त्यांच्या ॲक्‍टिव्हाला जोरदार धडक दिली. अपघातात आंचल ट्रकच्या चालकाच्या दिशेला असलेल्या समोरच्या चाकात फसली तर लक्ष्मी मागच्या चाकात सापडली. टिप्पर वेगात असल्यामुळे ट्रकचालकाने ब्रेक दाबल्यानंतर मुली जवळपास २० फुटांपर्यंत फरपटत गेल्या. यामुळे दोन्ही मुलींच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. रोडला चिकटलेले मृतदेह फावड्याने काढावे लागले. 

या अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळावरून पळून गेला. अपघातानंतर लोकांनी एकच गर्दी केली होती. परिसरात तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच कळमना पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी रमाशंकर शाहू (वय ४८) यांच्या तक्रारीवरून आरोपी टिप्परचालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

राखीव दलाला पाचारण
अपघात झाल्यानंतर नागरिकांची तोबा गर्दी होती. वातावरणही तापले होते. काहींनी टिप्पर पेटविण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी जाळपोळ करण्याचा पवित्रा घेतला. टिप्परच्या काचाही फोडल्या. त्यामुळे कळमना पोलिसांनी ताबडतोब राखीब पोलिस पथकाला पाचारण करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 

हरविल्या संवेदना
जेव्हा अपघात झाला त्यावेळी काही जण मदत करण्याऐवजी मोबाईलने फोटो आणि व्हिडिओ काढत होते. अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी होती, परंतु कुणीही पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे आता व्यक्‍तींमधील संवेदना हरविल्याची खंत व्यक्‍त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Sister Death in Accident Crime