Nagzira Sanctuary : नागझिरा अभयारण्यात आल्या दोन वाघिणी; वन्यप्रेमींमध्ये आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two tigresses released today in Navegaon Nagzira Tiger Reserve Sudhir Mungantiwar

Nagzira Sanctuary : नागझिरा अभयारण्यात आल्या दोन वाघिणी; वन्यप्रेमींमध्ये आनंद

भंडारा : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दोन वाघिणींना आज शनिवारी सोडण्यात आल्या. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सहक्षेत्रात वीस वाघांची क्षमता आहे परंतु सद्यःस्थितीत येथे केवळ ११ वाघ आहेत. त्यात नऊ नर व दोन मादी वाघ आहेत. त्यामुळे आज, शनिवारी नागझिरा येथे दोन वाघिणींना सोडण्यात आले आहे.

अनेक दिवसांपासून पर्यटकांना नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांचे दर्शन सहजासहजी होत नाही. त्यामुळे जंगलातील वाघांची संख्या वाढवून जंगलाचे संतुलन राखण्यासोबत पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने नागझिरा येथे आज दोन वाघिणींना सोडण्यात आले आहे. जगात सर्वात जास्त वाघांची संख्या भारतात आहे. भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या महाराष्ट्रात असून त्यातील सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत.

त्यामुळे वाघांचे कॅपिटल म्हणून विदर्भाची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे शनिवारी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणींना सोडल्याने आता पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची मेजवानी मिळणार आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागझिरा येथे पत्रकार परिषदेत केले.

यावेळी खासदार सुनील भाऊ मेंढे यांच्यासह बाळा काशीवार ,खासदार अशोक नेते, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार विजय रहांगडाले, जि. प. सदस्य माहेश्वरी नेवारे, मुख्य वन्यजीव रक्षक महीप गुप्ता, मुख्य वनरक्षक रंगनाथ नाईकडे, पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, उपवन संरक्षक राहुल गवई, पुलराज सिंग, जयरामे गुंडा आर. यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, पर्यटन वाढण्याच्या दृष्टिकोनातून वाघ सोडावेत अशी अनेक दिवसांपासून खासदार मेंढे मागणी करत होते. त्यासाठी दहा महिन्यापासून या दोन वाघिणींना सोडण्याच्या कामावर वनविभाग लक्ष ठेवून होता.

नागझिरा अभयारण्यात नैसर्गिक अधिवास जास्त व वाघांची संख्या कमी असल्याने नागझिरा अभयारण्यात आज दोन वाघिणींना सोडण्यात आल्या आहेत. भविष्यात आणखीन तीन वाघिणींना सोडण्याचाही विचार केला जाईल.

मानव-वाघ संघर्ष रोखण्यावर भर

२०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आता २०२३ मध्ये वाघांची संख्या ५०० झालेली आहे. यासोबतच दुर्मीळ होत जाणाऱ्या जातीमधील माळढोक, गिधाड, सारस या पक्षांची संख्याही वाढवण्यासाठी वन विभाग काम करीत आहे. ज्या ठिकाणी वाघांची संख्या ज्या जंगलामध्ये वाघांची संख्या जास्त आहे.

तेथे तरुण वाघांचा वयस्क वाघांसोबत संघर्ष होतो. त्यामुळे वयस्क वाघांचे अस्तित्व धोक्यात आल्याने हे वाघ गावाकडे वळून वाघ व मानव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे ज्या जंगलात वाघांची संख्या अधिक आहे, अशा वाघांचे स्थलांतर कमी संख्या असणाऱ्या कमी वाघांची संख्या असणाऱ्या जंगलामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून वन विभाग काम करीत आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार वनरक्षक अरविंद बडगे यांनी केले.

टॅग्स :vidarbhatigeranimalForest