यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे दोन बळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

महागाव तालुक्‍यातील मुडाणा व आर्णी तालुक्‍यातील दातोडी येथील दोन तरुण शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. 15) उघडकीस आली. हे ओल्या दुष्काळाचे बळी असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

आर्णी/ महागाव (जि. यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यात यंदा ऐन पीक कापणीच्या हंगामात पंधरा दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आर्णी तालुक्‍यातील दातोडी येथील साष्टांग बाबाराव गावंडे (वय 40) या तरुण शेतकऱ्याने गळफास लावून गुरुवारी (ता.14) आपली जीवनयात्रा संपविली. अवकाळी पावसाने शेतातील पीक पूर्णपणे नष्ट झाले. जगायचे कसे व बॅंकेचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

त्यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. स्थानिक ग्रामविकास कार्यकारी सोसायटीचे दोन लाख 50 हजार व खासगीतील तीन लाख रुपये कर्ज आहे. हे कर्ज शेतमाल विकून ते फेडणार होते. परंतु, शेतातील कापूस व सोयाबीन अवकाळी पावसाने नष्ट केले.

त्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, बहीण व म्हातारे आईवडील आहेत.
दुसरी घटना महागाव तालुक्‍यातील साधुनगर मुडाणा येथे घडली. मोहन भाऊराव राठोड या 38 वर्षांच्या तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली.

अवकाळी पावसाच्या तडाख्यात त्यांच्या शेतातील कपाशीचे पीक उद्‌ध्वस्त झाले. बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्‍न होता. त्यांनी गुरुवारी (ता.14) मध्यरात्री घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

पंधरवड्यापूर्वी महागाव तालुक्‍यातील माळकिन्ही येथील शेतकरी गजानन रामजी शिरडकर यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गळफास लावून जगाचा निरोप घेतला होता. या घटनेच्या पाठोपाठ आज पुन्हा आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळल्याने तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे.

मोहन राठोड यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्याकडे मुडाणा युनियन बॅंकेचे अडीच लाखावर कर्ज थकित असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. अवकाळी पावसाने आडवा झालेला कापूस आणि कर्जाच्या परतफेडीचे चुकलेले गणित पाहून मोहन राठोड हताश झाले होते.

या विवंचनेत त्यांनी रात्री दीड वाजता घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे.

पाच लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान
यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल पाच लाख 23 हजार हेक्‍टर क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. केवळ साडेतीन लाख हेक्‍टरवरील पीक शाबूत स्थितीत असल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे.

ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यात जिरायती, बागायती, फळपिकांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांनी पंचनामे करून अंतिम अहवाल सादर केला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले आहे. जिल्ह्यात नऊ लाख हेक्‍टरवर खरीप हंगामाची पेरणी झाली आहे. त्यातील तब्बल पाच लाख 23 हजार 475 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे.

शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ
अवकाळी आलेल्या पावसाचा फटका चार लाख 40 हजार 757 शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्णपणे गेला आहे. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
 याची काळजी घेतली जाईल.
-डॉ. दीपक उके, विदर्भ व्यवस्थापक, आपत्कालीन सेवा अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two victims of wet drought in Yavatmal district