कारसह पुरात वाहून गेलेले दोन जण बचावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील नागरिक संततधार पावसाचा कहर बघत असताना आज पहाटे दोन युवकांनी मृत्यूच्या दाढेत अडकल्याचा अनुभव घेतला. मात्र, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या युवकांची सुखरूप सुटका केली. गडचिरोलीपासून 10 किलोमीटर अंतरावरील गुरवळा गावानजीक ही घटना अनेक नागरिकांनी बघितली.

गडचिरोली-  गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील नागरिक संततधार पावसाचा कहर बघत असताना आज पहाटे दोन युवकांनी मृत्यूच्या दाढेत अडकल्याचा अनुभव घेतला. मात्र, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या युवकांची सुखरूप सुटका केली. गडचिरोलीपासून 10 किलोमीटर अंतरावरील गुरवळा गावानजीक ही घटना अनेक नागरिकांनी बघितली.

गडचिरोली येथील निखिल सत्यनारायण चेरकरी (27) व देवदत्त शरद धारणे (26) हे दोन युवक आज भल्या पहाटे चारचाकी वाहनाने गुरवळा गावाकडे जात होते. मात्र, गावाच्या आधी शिवमंदिराच्या अलिकडे असलेल्या नाल्याला पूर आला होता. त्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करताच कार वाहून जाऊ लागली. यावेळी दोघेही कसेबसे बाहेर निघाले. एक जण कारच्या छतावर चढला, तर दुसरा झाडावर चढला.

सकाळी 6.45 च्या सुमारास माहिती मिळताच तहसीलदार डी.एस.भोयर, नायब तहसीलदार श्री.किरमे, दुरणकर, मडावी तसेच सहायक पोलिस निरीक्षक श्री.उदार, पोलिस उपनिरीक्षक श्री. सिसाळ, सहायक फौजदार सहारे, गौरकर, तिम्मलवार हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी ट्यूब व दोराच्या साह्याने दोन्ही युवकांना सुखरुप बाहेर काढले.

Web Title: two youth safe from floods in gadchiroli district