स्वबळाच्या चाचपणीसाठी उद्धव ठाकरे आज नागपुरात

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

नागपूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने विभागनिहाय बैठका घेणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीला नागपुरात येत आहेत.  या भेटीच्या माध्यमातून ते आगामी दोन्ही निवडणुकांची चाचपणीसुद्धा करणार असल्याचे समजते. 

उद्धव ठाकरे सकाळी साडेनऊ वाजता मुंबईवरून विमानाने नागपूरला येतील. प्राईड येथे थांबून साडेदहा वाजताच्या सुमारास रविभवन येथे बैठकीला उपस्थित राहतील. पहिली बैठक नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची ठेवण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी त्यांनी ३० मिनिटांचा वेळ निश्‍चित केला आहे. यानंतर इतर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. त्यांच्यासह बैठकीत परिवहनमंत्री दिवाकर रावते व इतर पदाधिकारीसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

विदर्भातील लोकसभेच्या १० जागा असून त्यापैकी आतापर्यंत शिवसेना केवळ ४ जागांवर लढत देत आहे. रामटेक, अमरावती, यवतमाळ-वाशीम व बुलडाणा या चारही जागांवर सध्या शिवसेनेचे खासदार आहेत.

उर्वरित ६ जागांवर सेनेला उमेदवार शोधावे लागणार आहेत. यात अकोला, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा-गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी अकोला वगळता इतर  मतदारसंघांमध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी भक्कम नाही. सुमारे पंचवीस वर्षे युती असल्याने आजवर शिवसेनेने विदर्भाकडे फारसे लक्ष दिले नाही. भाजप म्हणेल ती जागा लढायची आणि सोडायची असेच धोरण सेनेचे राहिले. याचा मोठा फटका सेनेला विदर्भात बसला आहे. गेली विधानसभा निवडणूक शिवसेना स्वतंत्रपणे लढली होती. विदर्भात सेनेचे केवळ चारच आमदार निवडून आले आहेत. भाजपसोबत युती असताना सेनेचे जवळपास ९ ते १० आमदार राहत होते.

‘स्वतः निवडणूक का लढत नाही?’
निवडणुकीच्या रणांगणात सिद्धांत व नेतृत्वाचा खरा कस लागतो. जयललिता, मायावती, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी या महिला पक्षाचे नेतृत्व करतात आणि स्वतः निवडणूकही लढवतात. पण, तुम्ही स्वतः निवडणूक का लढत नाही, असा सवाल श्रीनिवास खांदेवाले यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. 

उमेदवार ठरवणार
उद्धव ठाकरे यांनी औरगांबाद विभागात यापूर्वी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात लोकसभेचे संभाव्य उमेदवार ठरवण्यात आले असून त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले. त्यामुळे उद्याच्या बैठकीत विदर्भातील उमेदवारसुद्धा निश्‍चित केले जाण्याची शक्‍यता आहे. 

शिवसैनिकांमध्ये नाराजी
उद्धव ठाकरे यांच्या चर्चेत निवडक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाप्रमुखांकडून पदाधिकाऱ्यांची नावे मागितली आहेत. नागपूरमधून अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवकांचा  त्यात समावेश नसल्याने प्रचंड नाराजी आहे. माजी नगरसेवक बंडू तळवेकर, जगतराम सिन्हा, माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले नसल्याचे कळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com