वेदना ऐकून मुख्यमंत्रीही झाले निःशब्द; सोनझारी वस्तीत पीडित मातांचे केले सांत्वन

Uddhav Thackeray offered condolences to the victims in Sonjhari Bhandara hospital fire news
Uddhav Thackeray offered condolences to the victims in Sonjhari Bhandara hospital fire news

भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयास लागलेल्या आगीत आपले बाळ गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वतः भोजापूर येथील सोनझारी वस्तीत आले. या मातांच्या वेदना ऐकून मुख्यमंत्रीही काही काळ निःशब्द झाले. अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी महाराष्ट्रच आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटून दिला.

भंडारा येथील या भीषण घटनेत भोजापूर जवळच्या सोनझारी येथील गीता बेहरे यांची अवघ्या महिनाभराची मुलगी दगावली. शहराजवळ असलेल्या भोजापूर गावातील सोनझारी ही अवघ्या पाच-सहाशेची वस्ती. या वस्तीत बेहरे कुटुंबीय राहतात. मोलमजुरी करून ते आपली उपजीविका करतात.

गीता आणि विश्वनाथ यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला. मृत बालिका हे त्यांचे पहिलेच अपत्य. जन्मतः:च बाळाचे वजन अत्यंत कमी असल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु उपचार केंद्रात दाखल केले होते. तेथे गेले दोन महिने तिच्यावर उपचार सुरू होते. चांगल्या उपचारांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती.

अशीच परिस्थिती सीतेकसा येथील कविता बारेलाल कुमरे या मातेची. ती मोलमजुरी करून स्वतःचा निर्वाह करते. गेल्या महिन्यात सात तारखेला तिला पहिले अपत्य झाले. मात्र, या मुलीचे वजन कमी असल्याने तिला उपचारासाठी भंडारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तिचीही प्रकृती सुधारली होती आणि लवकरच तिला डिस्चार्ज मिळणार होता. मात्र, शनिवारी पहाटे आलेल्या त्या दुर्दैवी घटनेत या मातांचे सर्वस्व हिरावले गेल्याची दुःखद जाणीव या दोघींना झाली. त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आहे.

या घटनेमुळे अत्यंत व्यथित झालेले मुख्यमंत्री आज तातडीने भंडारा येथे दाखल झाले. भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत येऊन त्यांनी दोन्ही मातांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या कुटुंबांची सर्वतोपरी काळजी घ्या, असे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यापुढे अशी घटना घडणार नाही, असे वचन मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मातांना दिले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब आदी उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com