"उज्ज्वला'ने प्रदूषण कमी होणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नागपूर - स्वयंपाकासाठी ग्रामीण भागात चूल, शेगडीचा वापर होतो. यामुळे होणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. उज्ज्वला योजनेमुळे सिलिंडरचा वापर वाढणार आहे. यामुळे प्रदूषण आणि आरोग्याची समस्या दूर होईल, अशी आशा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 

नागपूर - स्वयंपाकासाठी ग्रामीण भागात चूल, शेगडीचा वापर होतो. यामुळे होणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. उज्ज्वला योजनेमुळे सिलिंडरचा वापर वाढणार आहे. यामुळे प्रदूषण आणि आरोग्याची समस्या दूर होईल, अशी आशा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 

कस्तुरचंद पार्क येथे उज्ज्वला योजनेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. लाभार्थी महिलांना गॅस कनेक्‍शनचे वितरणही करण्यात आले. केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) धर्मेंद्र प्रधान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, खासदार विकास महात्मे, आमदार अनिल सोले, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, मिलिंद माने उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले की, ही योजना गरिबांच्या हिताची आहे. या योजनेमुळे प्रत्येक घरी गॅस कनेक्‍शन मिळेल. दारिद्य्ररेषेखालील महिलांना उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्‍शन देण्याचे पंतप्रधानांचे कार्य लाभार्थी आयुष्यभर विसरणार नाहीत. हे वर्ष केंद्र सरकार गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरे करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

1510 कोटींच्या कामांचे भूमिपूजन 
शहरात 1510 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात प्रामुख्याने लिबर्टी टॉकीज ते पागलखाना मार्ग उड्डाणपुलाचा समावेश आहे. तसेच झिरो माईल ते गुरुद्वारा हा 630 कोटी रुपये खर्चाचा 2 कि.मी. अंतराचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. झिरो माईल ते ऑटोमोटिव्ह चौक 230 कोटींचा सिमेंट रस्ता, आरबीआय चौक ते टेलिफोन एक्‍स्चेंज सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले. 

जिल्हाधिकाऱ्यांची प्रशंसा 
जिल्ह्यात बचतगटांचे एक लाख सदस्य आहेत. त्यातील 40 हजार सदस्यांकडे गॅस कनेक्‍शन नाही. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या पुढाकारातून कनेक्‍शन देण्याची कार्यवाही सुरू आहे. यातील 15 हजार सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने 54 लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले. दीड हजार लोकांना कनेक्‍शन देण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले. उर्वरित 38 हजार 500 सदस्यांना गॅस कनेक्‍शन देण्यासाठी असेच प्रयत्न करा, असे सांगून गडकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रशंसा केली.

Web Title: ujjawal will reduce pollution