'माझा संघर्ष अद्याप संपलेला नाही '

'माझा संघर्ष अद्याप संपलेला नाही '

नागपूर - "आयुष्यभर संघर्ष केला. मोह-माया बाळगली नाही. आमिषांना बळी पडलो नाही. अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला. नेत्यांशी जवळीक ठेवली नाही. पण, कायम गरिबांसोबत राहिलो आणि त्यांच्यासाठी लढलो. माझ्या आयुष्यातील संघर्ष अद्याप संपलेला नाही,' अशा भावना ज्येष्ठ समाजसेवक व पत्रकार उमेशबाबू चौबे यांनी आज (सोमवार) येथे व्यक्त केल्या. 85 व्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि हितचिंतकांतर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 

महाल येथील राजे बख्तबुलंद शहा किल्ला पॅलेस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उमेशबाबूंच्या या हृद्य सत्कार सोहळ्याला समाजातील सर्व घटकांच्या लोकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. विशेष म्हणजे उमेशबाबू थेट दवाखान्यातून कार्यक्रमस्थळी पोहोचले. डॉक्‍टरांनी बोलण्यास मनाई केल्यावरही त्यांना चाहत्यांशी संवाद साधण्याचा मोह आवरता आला नाही. ते म्हणाले, "माझ्या आयुष्यात कुठलेही सिक्रेट नाही. लोकांसाठी जगलो आणि लोकांसोबतच राहिलो. नागपूर माझे प्रेम आहे. कुठलेही काम पुरस्कारासाठी केले नाही आणि उर्वरित आयुष्यातही करणार नाही. स्वभावाशी कधीही तडजोड केली नाही.' 

"नागपूर सुधार प्रन्यासच्या एका तत्कालीन विश्‍वस्ताने रामनगर येथे घर देतो अशी ऑफर दिली होती. मात्र, आली वेळ तर झोपडीत राहीन; पण अशा मोहांना बळी पडणार नाही, असे त्याला ठणकावून सांगितले,' यासारखे अनेक अनुभव उमेशबाबूंनी सांगितले. यावेळी उमेशबाबूंची लाडूतुला करण्यात आली आणि 85 दिवेही लावण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक राजे वीरेंद्र शहा, राजमाता राजश्रीदेवी शहा यांच्यासह माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री मधुकराव किंमतकर व सतीश चतुर्वेदी, नगरसेवक दयाशंकर तिवारी, डॉ. शरद निंबाळकर, प्राचार्य हरिभाऊ केदार, पं. उमेश शर्मा, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, ओमप्रकाश मिश्रा, दीनानाथ पडोळे, एम. ए. कादर, ज्योती आमगे, राजेश कुंभलकर आदींची उपस्थिती होती. 

"पद्मश्री'साठी प्रयत्न करणार 
सत्कारापूर्वी प्रास्ताविक करताना ओमप्रकाश मिश्रा यांनी उमेशबाबू चौबे यांना "पद्मश्री' मिळावा यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्याचा प्रस्ताव मांडला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि प्रस्तावाला संमती दर्शविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com