भूमिगत खाणीची अद्‌भुत सहल; देशातील पहिलाच प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

नागपूर - सामान्यांना कोळसा खाणीत जाण्यास मनाई असते. त्यामुळे तेथे नेमके काय घडते, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. हेच हेरून सावनेर येथे वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडने भूमिगत खाणीचे मॉडेल तयार केले आहे. यात शिरताच तुम्हाला खाणीतील अनुभव घेता येतो अन्‌ तेथील कार्याची माहिती मिळते. सहा जानेवारीला पहिली खाण पर्यटन सहल येथे जाणार आहे.

नागपूर - सामान्यांना कोळसा खाणीत जाण्यास मनाई असते. त्यामुळे तेथे नेमके काय घडते, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. हेच हेरून सावनेर येथे वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडने भूमिगत खाणीचे मॉडेल तयार केले आहे. यात शिरताच तुम्हाला खाणीतील अनुभव घेता येतो अन्‌ तेथील कार्याची माहिती मिळते. सहा जानेवारीला पहिली खाण पर्यटन सहल येथे जाणार आहे.

कोळसा खाण आणि कामगारांचे जीवनमान तसे खडतरच. त्यामुळे नेहमीच हा भाग दुर्लक्षित. नागपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीही त्याला अपवाद नाही. मात्र, या खाण पर्यटन व इको पार्कच्या निमित्ताने आता या भागात पर्यटकांची रेलचेल वाढण्यास प्रारंभ होत आहे. व्याघ्र पर्यटनासाठी मध्य भारत जगप्रसिद्ध असून आता विदर्भ देशातील पहिल्या खाण पर्यटनासाठी ओळखला जाणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि वेकोलिमध्ये सामंजस्य करार नुकताच केला. एमटीडीसी या खाण पर्यटनाचे संचालन करणार आहे. तब्बल सहा एकरांत "माईन टुरिझम सर्किट' साकारण्यात आले आहे. देशातील हे पहिलेच सर्वोकृष्ट "इको फ्रेण्डली माईन टुरिझम सर्किट आहे. इको पार्कमध्ये घनदाट झाडी असून त्यात दीड एकरात हिरवळ आहे. देशी झाडांचे व फुलांचे शेकडो प्रकार येथे बघायला मिळतील. सामान्यपणे कोळसा खाणीपासून दूरच बरे, असे म्हणणारे आता आपसूकच या उद्यानाकडे वळत आहेत.

देशातील पहिल्या खाण पर्यटनाचा गौरव पंतप्रधान मोदींनीही आपल्या "मन की बात'मध्ये केला होता. तेव्हापासून या खाण पर्यटनाबद्दल उत्सुकता आहे. पूर्वी पायी चालत जाऊन खाणीतून कोळसा काढला जात असे. पण, आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने खाणीच्या आत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक सायकल आणि दोरांचा वापर केला जातो. खाणीत दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत सुरक्षा बेल्ट, जॅकेटसह सायकलने जाता येते.
- डी. एम. गोखले, सहाय्यक व्यवस्थापक, वेकोलि

290 किलोचा दगडी चेंडू
"इको फ्रेण्डली माईन टूरिझम सर्किट'मध्ये विविध प्रकारचे पाण्याचे फवारे आणि दगडी शिल्प लावण्यात आले आहेत. वैज्ञानिक दृष्टीने काही फवारे येथे उभारण्यात आले आहेत, तर उद्यानातील 290 किलो वजनाच्या गोल दगडी चेंडूचे शिल्प सर्वांना आकर्षित करते. केवळ पाण्याच्या धारेवर हा 290 किलोचा दगडी चेंडू अगदी अलगद फिरतो. यात वैज्ञानिक कौशल्याचा आधार घेतला आहे.

देशातील पहिलाच पार्क
पूर्वी "इको फ्रेण्डली माईन टुरिझम सर्किट' बघण्यासाठी विदेशात जावे लगत असे. मात्र, वेकोलिच्या पुढाकाराने आता आपल्या देशातच पहिला असा पार्क तयार करण्यात आला आहे. विदर्भासाठी हे उद्यान गौरवास्पद बाब आहे. प्रदूषणावर नियंत्रण अन्‌ पर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम आहे.

Web Title: Underground mines tour