पंधरा वर्षे नोकरीनंतर बेरोजगारीचे संकट

पंधरा वर्षे नोकरीनंतर बेरोजगारीचे संकट

नागपूर : घराघरांतून कचऱ्याची उचल करणाऱ्या "कनक'च्या कर्मचाऱ्यांनी गेली पंधरा वर्षे सेवा दिली. मात्र, आता त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट घोंगावत आहे. नव्या कंत्राटदार कंपन्यांनी 50 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर येण्याची भीती आहे. 
महापालिकेने कनक रिसोर्सेसला घराघरांतून कचरा उचल करण्याचे कंत्राट दिले होते. परंतु, आता महापालिकेने घराघरांतून कचरा गोळा करणारी कंत्राटदार कंपनी बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील महिन्यापासून नवीन कंत्राटदार कंपन्या ए. जी. एनव्हायरो प्रा. लि. व बीव्हीजी प्रा. लिमिटेड घराघरांतून कचरा उचलण्याचे काम सुरू करणार आहे. "कनक'कडे गेली पंधरा वर्षांपासून घराघरांतून कचरा उचल करणारे 1700 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांतील 50 वर्षे वय झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास दोन्ही कंपन्यांनी नकार दिला असल्याचे असंघटित कामगार संघटनेचे कार्यकर्ते लोकेश मेश्राम यांनी नमूद केले. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी काम करीत असून त्यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याबाबत मेश्राम यांनी मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. महापालिकेने झोन क्रमांक एक ते पाचमधील घराघरांतून कचरा गोळा करण्याचे कंत्राट ए. जी. एन्व्हायरो कंपनीला तर झोन क्रमांक सहा ते 10 मधील घरातील कचरा गोळा करण्याचे कंत्राट बीव्हीजी कंपनीला दिले. 
आश्‍वासनाचा विसर 
कनकमधील कर्मचाऱ्यांचे भवितव्य काय? यावर वेळोवेळी कर्मचाऱ्यांनी प्रशासनासोबत चर्चा केली. मनपा आयुक्तांनी कनकच्या कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. आयुक्तांच्या आश्‍वासनानंतरही कंपन्यांनी 50 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्‍यता बळावली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com