कधी सुटेल बेरोजगारीची समस्या?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

धामणगावरेल्वे विधानसभा मतदारसंघात आजवर अनेक कामे झालीत. अनेक बदलही झाले, परंतु मतदारसंघात आजही कायम असलेला सर्वांत मोठा प्रश्‍न म्हणजे बेरोजगारी. यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हाच मुद्दा घेऊन युवा मतदार उमेदवारांना जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.

धामणगावरेल्वे : जातीय समीकरण या वेळी काहीही असले तरी मतदारसंघातील सर्वांत मोठा भेडसावणारा प्रश्‍न हा बेरोजगारी आहे. नव्याने मतदार बनलेल्या युवकांपुढे तो प्रश्‍न जातीपातीच्या राजकारणापेक्षा मोठा असणार आहे. रोजगारासाठी मतदारसंघातील अनेक तरुणांना इच्छा नसताना गाव सोडावे लागले. अनेक वृद्ध आईवडिलांना त्यांच्या मुलांपासून दूर व्हावे लागले. चांगले शिक्षण व बेरोजगारी या मुद्यावर आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे दर्जेदार शाळा असताना शिक्षकांची कमतरता तालुक्‍याला भेडसावत आहे. यासोबतच उद्योगधंद्यांची कमतरता हा प्रश्‍न आजही तितकाच गंभीर आहे. आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मते मतदारसंघातील शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेतीला मदत होईल, असे तलाव बांधणे, पाण्याची व्यवस्था करून देणे आवश्‍यक आहे. याशिवाय लोकप्रतिनिधी गेल्या 15 वर्षांत कुठलाही मोठा उद्योग या मतदारसंघात उभारू शकले नाहीत. विकासाच्या नावावर केवळ शासकीय इमारती मतदारांना पाहायला मिळत आहेत.
ब्रिटिशकालीन आणि सर्वाधिक मोठा असलेला चांदूररेल्वे तालुका हा सर्वदूर पसरलेला होता. त्यावेळी आताचे धामणगावरेल्वे, नांदगावखंडेश्वर, तिवसा, चांदूररेल्वे हे चार तालुके त्यात समाविष्ट होते. हा तालुका मोठा तालुका म्हणून अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध होता. त्यातील धामणगाव व चांदूर या शहरातून नागपूर-मुंबई लोहमार्ग गेला आहे. परंतु, या तालुक्‍यात फारसा विकास झालेला दिसत नाही. यशवंत शेरेकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्या काळात ते ऊर्जामंत्री होते. त्यांनी देवगाव साखर कारखाना या भागात आणला होता. परंतु, तोसुद्धा टिकाव धरू शकला नाही. याआधी राम मेघे यांनी फुबगाव साखर कारखाना सुरू केला, तोसुद्धा येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकला नाही. काही वर्षांतच तोही मोडकळीस आला. आमदार अरुण अडसड यांची सूतगिरणी व पतसंस्थेने काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असला तरी तो मतदारसंघासाठी पुरेसा नाही. त्यामुळे मतदारसंघातील बेरोजगारीची समस्या सुटताना दिसत नाही.
खासगी उद्योगांकडून मिळतोय रोजगार
लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने मोठाले उद्योग व कारखान्यांसाठी हा भाग प्रतिकूल असला तरी उद्योजक गिरासे बंधूंनी उभारलेले मिनरल वॉटर प्रकल्प, दूधप्रकल्प व आता बांधकाम सुरू असलेले संत्राप्रक्रिया उद्योग मतदारसंघातील युवकांसाठी लक्षवेधी ठरत आहेत. त्यांनी उभारलेला संत्राप्रक्रिया उद्योग हा बेरोजगारांना व संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unemployment issue in dhamangaon railway