आर्णी (जि. यवतमाळ) : लग्न म्हणजे दोन कुटुंबांना जोडणारा आनंदोत्सव. नवदांपत्यांच्या जीवनातील उत्साहाचा क्षण. हा सोहळा सुरू असताना वराच्या काकांच्या निधनाची बातमी आली आणि आनंदाचा क्षण क्षणार्धात दु:खात परावर्तित झाला. नातेवाईक, आप्तेष्टांनी वधू-वरांवर आशीर्वादरूपी अक्षता टाकून अंत्यविधीत सहभागी होत वराच्या काकांना अखेरचा निरोप दिला.
तालुक्यातील साकूर येथील अशोक कृष्णराव शिंदे यांचा मुलगा योगेश यांचा विवाह दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथील देवीदास साबळे यांची कन्या निकिता हिच्यासोबत गुरुवारी (ता. सहा) दुपारी अकराला एकवीरा देवी देवस्थान हिवरा संगम येथे आयोजित केला होता. या विवाहासाठी शिंदे व साबळे कुटुंबीय आणि मित्रमंडळी आले होते. लग्न वेळेवर पार पडले. लग्नमंडपात साडेतीनच्या सुमारास मुलाच्या काकांच्या मृत्यूची बातमी आली. ती क्षणात वाऱ्यासारखी कानोकानी पोहोचली. महिलांची रडारड सुरू झाली. प्रवीण कृष्णराव शिंदे (वय 49) हे वराचे काका. त्यांचा सोमवारी (ता. तीन) रात्री आठला आर्णी येथे यवतमाळ रोडवरील बायपासजवळ अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी प्रथम आर्णीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ व नंतर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, मेंदूजवळ रक्ताच्या गाठी तयार झाल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता. सहा) दुपारी साडेतीनला मृत्यू झाला. याच दिवशी त्यांच्या पुतण्याचे लग्न होते. लग्नसोहळा आटोपताच लग्नमंडपात काकांच्या मृत्यूची बातमी पोहोचली. क्षणात आनंदाचे दु:खात रूपांतर झाले. सर्व वऱ्हाडी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी थांबले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.