घरी सुरू होती लग्नाची तयारी अन कोसळले दुःखाचे डोंगर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 December 2019

नियतीने साधलेल्या या खेळात गावकऱ्यांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडली. दोघींचीही अंत्ययात्रा एकाच वेळी काढली. सासू आणि सुनेचा मृत्यू एकाच दिवशी होण्याची घटना गावाकरिता नवीच होती. यामुळे या अंत्ययात्रेत गावकऱ्यांचाही सहभाग होता. या अंत्ययात्रेत सहभागी प्रत्येकाच्या तोंडी या दोघींच्या अशा आगळ्या मृत्यूचीच चर्चा होती.

गिरड (जि.वर्धा) : घरी लग्नाची तयारी सुरू होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. अंथरुणाला खिळलेली आजी  वृद्धापकाळाने गेली अन जन्मदात्या  आईने आजारपणामुळे जगाचा निरोप घेतला.

सासू आणि सुनेचे पटेलच असे नाही. बऱ्याच ठिकाणी या दोघींतील वाद घराचे विभाजन करण्याचे कारण ठरते. पण, कोरा येथे नियतीने या दोघींवर एकाच वेळी घाला घातला. सासू आणि सुनेचा एकाच दिवशी मृत्यू झाला. या घटनेने सासू आणि सुनेतही प्रेमाचे नाते असते, याचा प्रत्यय घडून आला.

Image may contain: 1 person, closeup
पार्वता नखाते

 

Image may contain: 1 person, closeup
दुर्गा नखाते

कोरा येथील पार्वता महादेव नखाते यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (ता. 24) रात्रीच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच दुर्गा हरिदास नखाते यांचाही मृत्यू झाला. दुर्गा ही बऱ्याच दिवसापासून आजारी होती. या दोघींचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

जाणून घ्या - 72 वर्षांनंतरही होता काळोख, आता सौरदिव्यांनी उजळले हे गाव
 

नियतीने साधलेल्या या खेळात गावकऱ्यांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडली. दोघींचीही अंत्ययात्रा एकाच वेळी काढली. सासू आणि सुनेचा मृत्यू एकाच दिवशी होण्याची घटना गावाकरिता नवीच होती. यामुळे या अंत्ययात्रेत गावकऱ्यांचाही सहभाग होता. या अंत्ययात्रेत सहभागी प्रत्येकाच्या तोंडी या दोघींच्या अशा आगळ्या मृत्यूचीच चर्चा होती.

क्लिक करा - दहशत : शौचास गेलेल्या व्यक्तीला वाघाने केले ठार
 

दोघींची सोबतच काढण्यात आली अंत्ययात्रा
घरातील दोन महिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने नखाते परिवारावर आघात कोसळला. पण, नियतीच्या या खेळामुळे दोघींच्या मृत्यूची चर्चा पंचक्रोशीत झाली. कुटुंबीयांचे सांत्वन करणाऱ्यांच्या गराड्यात हे दु:ख जरा हलके झाल्याचे काही जण बोलत होते. असे असले तरी ज्यांचे दु:ख त्यांनाच सोसावे लागते, असेही काहींच्या तोंडून निघाले.

दुर्गा यांच्या मुलीचा 19 ला विवाह
या घटनेत मृत्यू झालेल्या दुर्गा यांच्या मुलीचा विवाह 19 जानेवारीला आहे. सासू आणि सुनेने एकाच वेळी जगाच्या निरोप घेतला. यामुळे या विवाहाच्या आनंदाला दु:खाची किनार आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unfortunate incident before marriage in wardha