esakal | 'महिन्याभरात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट'

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari
'महिन्याभरात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट'
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तिसरी लाट देखील लवकरच येईल असे बोलले जात आहे. अशावेळी परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यावेळी ऑक्सिजन उपलब्ध होणे शक्य होणार नाही. त्यासाठी लागणारा वेळ, परिस्थिती व पैसा या भविष्यातील अडचणी लक्षात घेता विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महत्तम क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे आदेश केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतलेल्या बैठकीत देण्यात आले.

हेही वाचा: नागपूरकरांनो घाबरू नका! बाधितांची संख्या होतेय कमी; कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण अधिक

सायंकाळी सहाच्या सुमारास यासंदर्भात एक उच्चस्तरीय व्ही.सी. बैठक घेण्यात आली. या बैठकीला गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ,चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार ,गोंदियाचे पालकमंत्री नवाब मालिक, भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम, अमरावतीच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर ,अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू,वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई, यवतमाळचे पालकमंत्री सांदीपन भुमरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार,अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग तसेच अकराही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता.

विदर्भातील सध्याची परिस्थिती बघता तत्कालिक मदत म्हणून प्रत्येक जिल्ह्याला लागणारा महिन्याभराचा ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर तातडीने सर्व जिल्ह्याला पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. या सर्व पुरवठ्यावर नागपूरचे पालक मंत्री डॉ. नितीन राऊत, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हे नियंत्रण ठेवतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: कोरोनासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना नियुक्त करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

नितीन गडकरींनी सांगितलेले काही महत्वाचे मुद्दे -

  • विभागीय आयुक्त नागपूर व अमरावती यांच्यावर जबाबदारी

  • व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर,रेमडेसिव्हिर याची उपलब्धता करणार

  • विदर्भातील सर्व शासकीय व खासगी हॉस्पिटलला मुबलक ऑक्सिजन पुरवठा

  • रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार

  • ग्रामीण भागातील रुग्णांना बेड उपलब्धतेसाठी लक्ष देण्याचे निर्देश

  • सर्व मोठे हॉस्पिटल ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट

  • विदर्भातील रुग्णांसाठी विदेशातून थेट यंत्रसामग्री मागवणार

  • भिलाई केंद्रावरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्धार