गडचांदुरात अस्वच्छतेविरोधात केले अनोखे आंदोलन

साईनाथ सोनटक्के 
Thursday, 27 August 2020

गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक एक व दोनमधून भाजपचे नगरसेवक विजयी झाले आहेत. या प्रभागातील सफाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मागील चार-पाच महिन्यांपासून नियमित नाली सफाई केली जात नाही.

कोरपना (जि. चंद्रपूर) : प्रभागातील नाल्यांची नियमित सफाई होत नाही, फवारणी केली जात नाही. घंटागाडी येत नाही. नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी आकाशात काळे फुगे सोडले. ठिकठिकाणी फलक लावले. काळ्या फिती, झेंडे लावून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांच्या नेतृत्वात बुधवारी (ता. 26) हे आंदोलन पार पडले. 

गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक एक व दोनमधून भाजपचे नगरसेवक विजयी झाले आहेत. या प्रभागातील सफाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मागील चार-पाच महिन्यांपासून नियमित नाली सफाई केली जात नाही. फवारणीसुद्धा करण्यात आलेली नाही. घंटागाडी नियमित येत नाही. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

अवश्य वाचा- हाय रे दैवा आईदेखत चिमुकलीला बिबट्याने पळविले
 

नागरिकांची ही समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांनी प्रशासनाकडे केली. अनेकदा निवेदने दिली. परंतु, त्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारी डोहे, मोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाच्या विरोधात अनोखे आंदोलन करीत निषेध नोंदविण्यात आला. 

अवश्य वाचा- ...आणि नक्षल चळवळीच्या वाटेवरील युवक परतला घरी
 

या आंदोलनात महेश शर्मा, शिवाजी सेलोकर, नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, सतीश उपलेंचीवार, नीलेश ताजने, हरीश घोरे, संदीप शेरकी, अरविंद कोरे, बबलू रासेकर, अजीम बेग, कुणाल पारखी, सुयोग कांगरे, विनोद कावळकर, सुनील जोगी, परशुराम मुसळे, विजयालक्ष्मी डोहे, रंजना मडावी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique agitation against unhygienic conditions in Gadchandur