जागेअभावी रखडले विद्यापीठाचे सभागृह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तीन-चार हजार लोक बसू शकतील, अशा अत्याधुनिक सभागृहाची गरज आहे. त्यासाठी शासनाने मदत करावी, असा प्रस्ताव कुलगुरू डॉ. काणे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला. अत्याधुनिक सभागृह उभारण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोव्हेंबरमध्ये दिले होते. मात्र, जागाच मिळत नसल्याने प्रस्ताव धूळखात आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा व्याप मोठा आहे. दरवर्षी दीक्षान्त समारंभ, विविध प्राधिकरणांच्या सभा, समारंभ घेतले जातात. मात्र, यासाठी विद्यापीठाकडे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज सभागृह नसल्याने अनेकदा अडचण निर्माण होते. दीक्षान्त समारंभासाठी देशपांडे सभागृह गाठावे लागते. सध्या विद्यापीठ विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून, येत्या दोन वर्षांत विद्यापीठाची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे याच परिसरात सभागृह उभारण्यात यावे, असा प्रस्ताव कुलगुरूंनी मांडला. 

हे सभागृह अनेक शैक्षणिक कार्यक्रमांसह सामाजिक संघटना आणि समाजोपयोगी कार्यक्रमांसाठीही वापरण्यात येईल, अशी माहितीही कुलगुरूंनी दिली. यासाठी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा विद्यापीठाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिल्यामुळे येत्या काही वर्षात विद्यापीठाला नव्या प्रशासकीय इमारतीसह भव्य सभागृह मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, लालफीतशाहीमध्ये हे सभागृह अडकले आहे.

पुन्हा लांबणीवर
काही दिवसांपूर्वी या प्रस्तावावर चर्चा झाली. नागपूर सुधार प्रन्यासकडे जागा आणि खर्च ठरविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. आता नासुप्रच बरखास्त झाल्याने कामकाज पुन्हा लांबणार आहे. विद्यापीठ अमरावती मार्गावरील कॅम्पसची जागा देण्यास तयार आहे. असे असताना प्रकल्प कुठे अडकला, हे कळायला मार्ग नाही. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत: हस्तक्षेप घालून प्रकल्प पूर्ण करावा, अशी अपेक्षा विद्यापीठाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: university auditorium problem by place