आमदार साहेब, दारू प्यायला 500 रुपये द्या : अधिवेशनात पडसाद 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 December 2019

सोमवारपासून नागपुरात सुरू झालेले हिवाळी अधिवेश एका ना अनेक विषयांवर गाजत आहे. पहिला दिवस सावरकरांचा मुद्दा तर दुसरा दिवस शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या विषयावर गाजला. यानंतर उजाडलेला तिसरा दिवस असुरक्षितेने गाजला.

नागपूर : स्थळ नागपूरचे आमदार निवास... मध्यरात्र झालेली... सर्वत्र शांतता... अचानक एका आमदाराच्या खोलीचा दार जोरजोराने वाजतो... आमदार महोदयांची झोपमोड होते... ते त्यांच्या साहाय्यकाला दार उघडायला सांगतात... बघातत तर काय, एक दारूड्या दारावर उभा... साहेब दारू प्यायला 500 रुपये द्या..., नाही तर पाहून घेईन. हा सर्व प्रकार त्या आमदाराने बुधवारी विधानसभेत सांगितला. 

सोमवारपासून नागपुरात सुरू झालेले हिवाळी अधिवेश एका ना अनेक विषयांवर गाजत आहे. पहिला दिवस सावरकरांचा मुद्दा तर दुसरा दिवस शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या विषयावर गाजला. यानंतर उजाडलेला तिसरा दिवस असुरक्षितेने गाजला. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री अद्यात गुंडांनी गोळीबार केला. या विषयावर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आमदारांच्या असुरक्षिततेचा मुद्दा देखील सभागृहात उपस्थित करण्यात आला. 

आमदार निवासात आमदार असुरक्षित

नागपुरात अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांची निवासाची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याची काही आमदारांची तक्रार आहे. आमदारांच्या खोलीत मध्यरात्री दारूडे शिरत असून, आमदार असुरक्षित नसल्याची भावना आमदारांनी व्यक्त केली. भाजपच्या दोन आमदारांनी कायदा व सुव्यवस्थेवर सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला. 

महिला आमदारांसाठी सुरक्षा अधिकारीच नाही

भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी काही आमदारांचे कार्यकर्ते व स्वीय साहाय्यक रात्रीच्या सुमारास दारून पिऊन आमदार निवासात धिंगाणा घालतात अशी तक्रार केली. रात्रीच्या वेळी महिलांसाठी सुरक्षा अधिकारी देखील उपलब्ध राहत नसल्याचे म्हात्रे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. 

हेही वाचा -  #NagpurWinterSession : राजकीय भूकंप होणार, एकनाथ खडसे देणार भाजपला धक्का?

विधानसभा अध्यक्षांनी दिले सरकारना निर्देश

आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. महिला आमदारांसाठी आमदार निवासातील एक मजला आरक्षित करण्यात आला आहे. तेथे तातडीने महिला सुरक्षा अधिकारी नेमण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. 

Image may contain: text

महापौरांवर गोळीबार झाल्याचे पडसाद विधानसभेत

उपराजधानीत महापौरांवर गोळीबार झाला या पार्श्‍वभूमीवर विधानभवन परिसरात पडसाद उमटले. अनेक आमदारांनी लोकप्रतिनिधींनी राज्यात सुरक्षा व्यवस्था ढासळली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार आशीष शेलार म्हणाले, हे सरकार गुन्हेगारांना अभय देणारा सरकार आहे. नालासोपारा येथे चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली तर उपराजधानीत महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार झाला. या दोन्ही घटना अतिशय निंदनीय आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हे अभद्र सरकार आहे. हे सरकार अस्थिर वातावरणात असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे फावत आहे. अधिवेशन सुरू असताना अशा प्रवृत्ती डोकेवर काढतात. जनतेला सुरक्षित वातावरण देण्यात सरकार नापास झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unknown person demanded maoney for liquor at nagpur mla hostel