संवेदना मेल्या की काय? अमरावतीत नकोशीला सोडून पलायन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

चाइल्डलाइन आणि शहर कोतवाली पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ती चिमुकली जिवंत असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. झाले असे की, 1098 वर चाइल्डलाइनला माहिती मिळाली. होलिक्रॉस परिसरातील रूममध्ये टेबलवर एक व्यक्ती बाळाला बेवारस स्थितीत सोडून निघून गेली.

अमरावती : ज्यांच्या पोटी अपत्य जन्माला येत नाही, त्यांना त्याचे महत्त्व अधिक असते. अजूनही पुढारलेल्या समाजात जन्मापासूनच मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झालेला नाही. "जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी', अशी म्हण आहे. परंतु त्याकडे डोळेझाक करून जगणारा वर्ग समाजात आहे. एका सात दिवसांच्या नकोशीला अनाथालयात टेबलवर सोडून एक व्यक्ती निघून गेली. त्यामुळे समाजमन सुन्न झाले. 

शॉलमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत आढळली 
चाइल्डलाइन आणि शहर कोतवाली पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ती चिमुकली जिवंत असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. झाले असे की, 1098 वर चाइल्डलाइनला माहिती मिळाली. होलिक्रॉस परिसरातील रूममध्ये टेबलवर एक व्यक्ती बाळाला बेवारस स्थितीत सोडून निघून गेली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चाइल्डलाइनचे अजय देशमुख व शंकर वाघमारे यांनी संपर्क साधला. येथील सिस्टर ट्रिजा जोस व सुरेखा यांच्याशी चर्चा केली असता शिकवणी वर्गानंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्यारूममध्ये आल्या तेव्हा टेबलवर सात दिवसांची गोंडस मुलगी शॉलमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत आढळल्याचे त्यांनी सांगितले. 

चाइल्डलाइनच्या पदाधिकाऱ्यांनी शहर कोतवाली पोलिस व बालकल्याण समितीला याबाबत माहिती दिली. या प्रकरणात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळचे चाइल्डलाइन संचालक प्रा. डॉ. सूर्यकांत पाटील, प्रा. प्रशांत घुलक्षे, सचिव माधुरीताई चेंडके, श्रीकांत चेंडके, बालकल्याण समिती अध्यक्षा वंदना चौधरी, मीना दंडाळे, भास्कर उपाशे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. 

कसं काय बुवा? - व्हिडिओ...बघा शाळेतच गुरुजी कसे झिंगले ते... 

काही तासांपूर्वीच केली एकाने चौकशी 
घटनेच्या आधी सकाळच्या दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने होलिक्रॉस येथील परिसरात येऊन लहान बाळांना दाखल करण्याच्या प्रक्रियेविषयी विचारणा केली होती. पोलिस उपनिरीक्षक प्राजक्ता धावळे यांनी येथील सिस्टरचे बयाण नोंदविले. या विषयाचे दस्तावेज बालकल्याण समितीसमोर केले. समितीच्या आदेशाने चिमुकलीला काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून होम फॉर बेबीज, होलिक्रॉस येथे दाखल केले. 

Image may contain: 4 people, people sitting, food and indoor

सीसीटीव्हीचे फुटेज घेतले ताब्यात 
घटनेनंतर या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासले. त्याआधारे चिमुकलीला सोडून जाणाऱ्याचा शोध सुरू केला. त्यामुळे लवकरच त्याची खरी बाजू पुढे येण्याची शक्‍यता पोलिस व चाइल्डलाइनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - बहिणीच्या विलापाने गावकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू

जिल्ह्यातील दुसरी घटना 
जन्मल्यानंतर काही दिवसांतच चिमुकलीला बेवारस सोडून पसार होण्याची जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. काही महिन्यांपूर्वी चाइल्डलाइन व सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून त्याही मुलीला जीवनदान मिळाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unknown person leaft newborn baby in childline society