नागपुर-अमरावती महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नागपुर-अमरावती महामार्गावर कोंढाळी बाजारगार परीसरात मागील दोन वर्षात तीन वाघ व एक बिबट अज्ञात वाहनांच्या धडकेत ठार झाले आहेत.

कोंढाळी - नागपुर अमरावती राष्ट्रिय महामार्ग क्रमांक सहा वरील कोंढाळी पासुन 9 कि. मी. अंतवरील जुनापानी गावापासुन पाचशे मिटर अंतरावर बिबट अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची माहिती महामार्ग सुरक्षा पोलिसांनी कोंढाळी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना पहाटे साडेपाच वाजता दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपुर-अमरावती महामार्ग क्र. सहाचे जुनापानी गावानजिकच्या गोविंदराव किनकर व पंजाबराव किनकर यांचे शेताला लागुन असलेल्या महामार्गावर एक बिबट महामार्गावर मृत अवस्थेत पडला आहे, अशी माहिती महामार्ग सुरक्षा पोलिस उमेश तिवारी यांनी कोंढाळीचे वन परिक्षेत्र अधिकारी एफ. आर. आजमी यांना दिली. ही घटना  13 एप्रिलच्या पहाटे अंदाजे साडेपाचच्या घडली. 

दरम्यान माहिती कळताच वन अधिकाऱ्यांना आपले सहकारी राऊंड ऑफिसर एस. बी. मोहोड, आर एन डाखोळे, वनरक्षक मनोज भस्मे, योगेश पाटील, वाय. टी. घासले, ए. एम. काठमोडे, प्रियंका आवारी वनमजुर एस. एन. सोहलिया, आर. जे. क्षिरसागर, के. टी. कुसळकर यांना घेऊन त्वरित घटनास्थळ गाठले. स्थानिय नागरीक गुणवंत खवसे व सदाशिव कोडापे या दोन पंचा समक्ष घटनास्थळ पंचनामा केला. यात अज्ञात वाहनाचे धडकेत या बिबट्या तोंडाला जबर मार बसल्याने बिबट्याचे तोंड व जबडा रक्तबंबाळ झाले होते. तर उजव्या पायाला जबर दुखापत झालेली असुन शरिराचा अन्य भाग मात्र प्रथम घटनास्थळ पंचनाम्यात सुरक्षित अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले आहे. या बिबट्याचे वय अंदाजे दिड ते दोन वर्षाचे असल्याचे समजले आहे. नागपुर-अमरावती महामार्गावर कोंढाळी बाजारगार परीसरात मागील दोन वर्षात तीन वाघ व एक बिबट अज्ञात वाहनांच्या धडकेत ठार झाले आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Unknown vehicle crash leopard on Nagpur-Amravati highway