इग्नुचे परीक्षा केंद्र होणार 'अनरिचेबल'

मंगेश गोमासे
गुरुवार, 6 एप्रिल 2017

इग्नुच्या परीक्षांसाठी केंद्रीय विद्यालयाचा वापर

इग्नुच्या परीक्षांसाठी केंद्रीय विद्यालयाचा वापर
नागपूर  - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नु) विविध विभागांतील वार्षिक परीक्षा यापुढे केंद्रीय विद्यालयांच्या परिसरात घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यापीठाच्या या निर्णयाने अनेक विद्यार्थ्यांना केंद्र "अनरिचेबल' होणार असल्याने विद्यापीठाच्या "रिच टू अनरिच' या ब्रिद वाक्‍यालाच छेद मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि केंद्रीय विद्यालय यांच्यात एक बैठक झाली. त्यात केंद्रीय विद्यालयाच्या परिसरात परीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

यानुसार जून महिन्यात होणाऱ्या वार्षिक परीक्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सदूर शिक्षणासाठी उपयोगी असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे देशातील लाखो विद्यार्थी जुळले आहेत. देशातील बऱ्याच दुर्गम भागात असलेल्या केंद्रातून विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे यापूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा त्या-त्या ठिकाणी असलेल्या इग्नूच्या केंद्रावर व्हायच्या. मात्र, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ज्या ठिकाणी केंद्रीय विद्यालये आहेत, त्या ठिकाणी जावे लागण्याची शक्‍यता आहे. नागपूर विभागीय केंद्राचा विचार केल्यास या केंद्रात 16 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी बऱ्याच कमी जिल्ह्यात केंद्रीय विद्यालये आहेत. त्यामुळे अशावेळी परीक्षा केंद्र म्हणून केंद्रीय विद्यालयांची सक्ती केल्यास बऱ्याच प्रमाणात विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्‍यता आहे.

विद्यापीठ आणि केंद्रीय विद्यालयाने संयुक्तरीत्या हा निर्णय घेतला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर वगळता इतर बऱ्याच जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालये नाहीत. त्यामुळे विभागीय केंद्राच्या विविध केंद्रांवरच परीक्षा घेण्यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
- डॉ. शिवस्वरूप, संचालक, नागपूर विभागीय केंद्र, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

Web Title: unrechabale ignou exam center