पदभार स्वीकारताच मुद्‌गल रजेवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : अश्‍विन मुद्‌गल यांनी आज अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच ते दीर्घ रजेवर गेले. योग्य काम करत असतानाही शासनाकडून करण्यात आलेल्या बदलीमुळे प्रशासनात चांगलाच नाराजीचा सूर आहे.

नागपूर : अश्‍विन मुद्‌गल यांनी आज अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच ते दीर्घ रजेवर गेले. योग्य काम करत असतानाही शासनाकडून करण्यात आलेल्या बदलीमुळे प्रशासनात चांगलाच नाराजीचा सूर आहे.
मुद्‌गल यांनी अनेक जिल्ह्यांत जिल्हाधिकारी पदावर कार्य केले आहे. त्याचप्रमाणे नागपूर महानगर पालिका येथे आयुक्त म्हणून ही कार्य केले. प्रत्येकच ठिकाणी त्यांच्या कार्याची प्रशंसा झाली. त्यांच्या सर्व्हिस बुकवरही एकही "रेड' मार्क नाही. लोकप्रतिनिधींच्या तक्रारी नाहीत. नागपूर येथे जिल्हाधिकारी पदावरही त्यांचे काम उत्तम होते. शासनाच्या योजना अतिशय प्रभावीपणे राबविल्या. पीक कर्ज वाटप, कर्जमाफी योजनेला लाभ देण्यासाठी वेळोवेळी नियोजन केले. विद्यार्थ्यांना आवश्‍यक विविध प्रमाणपत्र पाटप करण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नाना पटोले यांनी अनेक तक्रारी केल्या. कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. अनेक तक्रारी, प्रकरण या खालच्या स्तरावर निकाली काढण्यासारख्या होत्या.
मात्र निवडणुकीशी संबंधित खालच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. उमरेड येथील डीव्हीआर चोरी प्रकरणातही खालच्या अधिकाऱ्यांकडून आयोगासमोर योग्य बाजू मांडता आली नाही. खालच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम त्यांच्या अंगलट आला. आयोगाच्या निर्देशावरून शासनाने त्यांची तडकाफडकी बदली केली. मुद्‌गल यांचे काम उत्तम असतानाही अशाप्रकारे बदली केल्याने प्रशासनात नाराजी सूर आहे. अशाप्रकारे शासन कारवाई करीत असेल प्रशासनात काम करणे अवघड होईल. चांगले केल्यावरही अशाप्रकारे वागणूक मिळत असेल तर फायदा काय, हा प्रकार योग्य नाही. बदली करायची होती तर निवडणुकीपूर्वी किंवा त्यानंतर करायला पाहिजे होती. यामुळे अधिकाऱ्यांचा "मॉरल डाऊन' होते, अशी प्रतिक्रिया प्रशासनात उमटत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Upon acceptance of office, Mudgal leave