उपसरपंचाचा चिरला गळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

खापरखेडा/सिल्लेवाडा - सिल्लेवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मधुकर दुगाने यांचा गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. ६) सकाळी घडली. त्यांना उपचारार्थ नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती नाजूक  आहे. 

खापरखेडा/सिल्लेवाडा - सिल्लेवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मधुकर दुगाने यांचा गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. ६) सकाळी घडली. त्यांना उपचारार्थ नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती नाजूक  आहे. 

उपसरपंच मधुकर दुगाने (वय ४८) हे सकाळी शेतात गेले होते. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गावातीलच रूपेश बापचे यांना दुगाने शेतातील पायवाटेवर पडून असल्याचे दिसले. त्यांचा गळा चिरलेला होता. त्यांनी आरडाओरड करून आसपासच्या लोकांना एकत्र केले. घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दुगाने यांना खापरखेडा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्‍टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना नागपुरात पाठविले. खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. खापरखेडा पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक व श्‍वानपथक दाखल झाले. घटनास्थळावरून रक्ताने माखलेला कटर व मोबाईल मिळाला. 

पोलिस ठाण्यावर मोर्चा काढणार
सावनेरचे आमदार सुनील केदार यांचे दुगाने हे कट्टर समर्थक व काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणाची चौकशी करून आरोपीस शिक्षा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी आमदार केदार यांच्या नेतृत्वात पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर, सिल्लेवाडासह खापरखेडा, वलनी, चनकापूर, पोटा, रोहना, भानेगाव येथील नागरिकांनी सामूहिक बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय वैमनस्यातून खुनाचा प्रयत्न?
दुगाने यांचे गावातच स्वस्त धान्याचे दुकान आहे. गावाच्या राजकारणात प्रभाव असणारे दुगाने यांच्या खुनाचा प्रयत्न राजकीय वैमनस्यातून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. खुनाचा प्रयत्न करणारे सराईत गुन्हेगार नसावेत. दुगाने यांचा गळा थर्माकॉल कटरने कापण्यात आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

Web Title: upsarpanch madhukar dhugane Chopped wildly trying to murder