अमेरिकेच्या माजी सैनिकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नागपूर - अमेरिकेच्या सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका सैनिकाला नागपूर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे त्या सैनिकाची सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. याशुवा मेसियाक लैबोविथ (वय 35) माजी अमेरिकन सैनिकाचे नाव आहे. त्याचा भारतात राहण्याचा मुख्य उद्देश काय? याबाबत पोलिस तपास करीत आहेत. 

नागपूर - अमेरिकेच्या सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका सैनिकाला नागपूर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे त्या सैनिकाची सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. याशुवा मेसियाक लैबोविथ (वय 35) माजी अमेरिकन सैनिकाचे नाव आहे. त्याचा भारतात राहण्याचा मुख्य उद्देश काय? याबाबत पोलिस तपास करीत आहेत. 

याशुवा 2013 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. 10 जून 2013 ला तो नागपुरात आला. सामाजिक कार्याच्या नावावर धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी याशुवाने काही मिशनरींच्या माध्यमातून एका हॉटेलमध्ये सुरुवातीचे काही दिवस मुक्काम केला. त्यानंतर त्याने भाड्याने खोली घेतली. दरम्यान, तो दीपाली नावाच्या तरुणीच्या संपर्कात आला. तो मागील साडेतीन वर्षांपासून नागपुरात राहात आहे. 

नागपुरातील तरुणीशी केले लग्न 
याशुवा याची दीपाली नावाच्या युवतीशी चांगली गट्टी जमली. "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये काही दिवस राहिल्यानंतर त्याने दीपालीशी लग्न केले. त्यांनी बोरगाव येथील गोकुल हाउसिंग सोसायटीच्या अल्फाईन मिडासमध्ये 302 क्रमांकाचा फ्लॅट घेतला. येथे राहात असताना त्यांनी परिसरातील नागरिकांशी चांगलीच ओळख केली. हे दोघेही काय काम करतात, याबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतु, त्या दोघांचेही राहणीमान आलिशान होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

नवीन उपायुक्तांनी केली चौकशी 
विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी शहरात विदेशी नागरिकांची संख्या जाणून घेण्यासाठी सर्व ठाण्यांकडे माहिती मागितली. यावेळी याशुवा नावाचा अमेरिकन नागरिक नागपुरात राहात असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो कुठे राहतो, काय करतो, त्याचा पासपोर्ट, व्हिजाची मुदत आहे की संपली, की वाढविण्यात आली? या सर्व गोष्टींची माहिती काढण्यात आली. त्याचा शोध घेऊन शनिवारी अटक करण्यात आली. त्याच्या पासपोर्ट आणि व्हिजाची मुदत संपल्यामुळे त्याच्याविरोधात विदेशी नागरिक कायदा 1946 च्या कलम 14 अ, ब, क अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

शनिवारी याशुवा या अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली. त्याचा नागपुरात राहण्याचा मूळ उद्देश तपासाअंती स्पष्ट होईल. सध्या त्याची न्यायालयीन कोठडीत म्हणजे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 
-नीलेश भरणे, पोलिस उपायुक्‍त, विशेष शाखा. 

Web Title: US ex-servicemen arrested