इको-फ्रेंडली प्रचार साहित्यांचा वापर करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

गोंदिया : विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी प्लॅस्टिक, पॉलिथिनचा वापर न करता पर्यावरण स्वच्छता व संवर्धनासाठी इको फ्रेंडली प्रचार साहित्य वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष तसेच उम्मेदवारांना संवैधानिक कर्तव्य व आदर्श आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्या म्हणाल्या.

गोंदिया : विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी प्लॅस्टिक, पॉलिथिनचा वापर न करता पर्यावरण स्वच्छता व संवर्धनासाठी इको फ्रेंडली प्रचार साहित्य वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष तसेच उम्मेदवारांना संवैधानिक कर्तव्य व आदर्श आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्या म्हणाल्या.
भारत निवडणूक आयोगाने 21 सप्टेंबरपासून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान, आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करून निवडणुकीदरम्यान इको फ्रेंडली प्रचार साहित्यांचा वापर करण्यासाठी तसेच निवडणूक कालावधीत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेचे पालन करण्यासाठी मान्यताप्राप्त सर्व राजकीय पक्ष, विभागप्रमुख व नोडल अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता. 23) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे म्हणाल्या, उमेदवारांनी त्यांच्यावर दाखल फौजदारी गुन्ह्याबाबतची माहिती विहित नमुन्यात तीन वेळेस वर्तमानपत्रात, इलेक्‍ट्रॉनिक मीडियामध्ये 8 ऑक्‍टोबर ते 19 ऑक्‍टोबर या दरम्यान देणे बंधनकारक आहे. निवडणूक प्रचारासाठी शासकीय वाहनाचा वापर करता येणार नाही. शेवटच्या 48 तासांत उमेदवारांना कोणत्याही सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही.
विधानसभा निवडणुकीत प्रशासनाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाची टक्‍केवारी वाढविण्याची विशेष मोहीम चालविण्यात येत आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसंबंधी काही गैरसमज असल्यास त्याचे समाधान करण्यासाठी प्रत्यक्ष या मोहिमेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करणे आवश्‍यक आहे. ईव्हीएम तथा व्हीव्हीपॅटविषयी माहिती व जनजागृती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्‍यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून शंकांचे निराकरण केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुख व नोडल अधिकारी यांना आदर्श आचारसंहितेच्या 72 तासांत त्यांच्या विभागात सुरू असलेल्या कामांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच मतदानाची टक्‍केवारी वाढविण्याकरिता शाळा, महाविद्यालये, नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याचे निर्देश दिले. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा समन्वय अधिकारी (निवडणूक खर्च) विकास राऊळकर, नायब तहसीलदार आर. एस. पटले तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use eco-friendly promotional materials