चौपट वाढला कीटकनाशकांचा वापर

कृष्णा लोखंडे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

अमरावती : राज्यात गेल्या दहा वर्षांत कीटकनाशकांचा वापर चौपट वाढल्याचा धक्कादायक अहवाल कृषी विभागाने दिला आहे. रासायनिक औषधांचा वाढलेला वापर मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

अमरावती : राज्यात गेल्या दहा वर्षांत कीटकनाशकांचा वापर चौपट वाढल्याचा धक्कादायक अहवाल कृषी विभागाने दिला आहे. रासायनिक औषधांचा वाढलेला वापर मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात ढगाळ वातावरणामुळे उद्‌भवलेले रोग रोखण्यासाठी बुरशीनाशक व तणनाशकांचा वापर अनुक्रमे 25 व 40 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. मूग, उडिदावर मावा, सोयाबीनवर पाने खाणारी अळी, उंटअळी, चक्रीभुंगा तर कपाशीवर गुलाबी बोंडअळीसह मावा व तुडतुडे यांचे आक्रमण आहे. गेल्या दशकांत या किडींवर नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर चौपटीने वाढला आहे. 2008-09 मध्ये असलेला 3 हजार 637 मेट्रिक टन औषधांचा वापर 2017-18 मध्ये 15 हजार 568 मेट्रिक टनावर पोहोचला. काही भागांत सतत तर काही भागांत अखंडित पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवरील रोगांच्या प्रादुर्भावात आणि तणांची वाढ झपाट्याने होताना दिसते. दिवसेंदिवस शेतमजुरांच्या कमतरतेमुळे तणनाशके व कीटकनाशकांच्या वापराचे प्रमाण वाढत आहे. यंदाही हा आलेख कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
कृषी विभागाच्या अहवालानुसार 2008-09 मध्ये 3 हजार 637 मेट्रिक टन वापर होता, तो दरवर्षी वाढतच गेला आहे. गेल्या तीन वर्षांत त्यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2015-16 मध्ये 11 हजार 665, 2016-17 मध्ये 13 हजार 496 व 2017-18 मध्ये 15 हजार 568 मेट्रिक टन, असा वापर झाला आहे. यंदा तो सतरा हजारांचा आकडा पार करण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Use of pesticides increased by four times