रहदारीपूर्वीच चौपदरीकरण रस्त्याला तडे

रहदारीपूर्वीच चौपदरीकरण रस्त्याला तडे

आर्णी (जि. यवतमाळ) : नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी आटापिटा सुरू आहे. सुकळी तसेच लोणबेहळ ते कोसदणी भागात झालेल्या रस्त्याच्या कामाला रहदारीपूर्वीच तडे गेले आहेत. या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप जनतेतून होत असून, गुणवत्ता नियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

2019 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याचे लोकार्पण करण्यासाठी वेगात काम सुरू आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम देशातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या भोपाळ येथील दिलिप बिल्डकॉन कंपनीला देण्यात आले आहे. आर्णी तालुक्यातील तरोडा ते कोसदनीपर्यंत चाळीस किलोमीटरचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. दिवसरात्र चालणार्‍या या कामावर शेकडो मजूर व यंत्राद्वारे काम काम केले जात आहेत. परंतु, अनेक ठिकाणच्या कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप होत आहे. सुकळी तसेच लोणबेहळ ते कोसदणी भागातील जंगलात झालेल्या रोडवर मोठ्याप्रमाणात रस्त्याला तडे गेले आहेत. विशेष म्हणजे अद्याप रहदारी सुरू झालेली नाही. शंभर वर्षांचे आयुष्य असलेल्या रस्त्याला आजच तडा जात असेल तर, किती वर्षांत रस्त्याची वाट लागेल, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या निमित्ताने दिलीप बिल्डकॉन कंपनीचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

सुकळी ते लोणबेहळपर्यंत ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. लोणबेहळ येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असून, येथे वळण रस्ता तयार करण्यात आला आहे. येथे सर्वाधिक धूळ साचली आहे. सदर कंपनीकडून पाणी मारल्या जात नसल्याने ग्रामस्थांसह वाहनधारक धुळीने त्रस्त झाले आहेत. धुळीमुळे अपघात होण्यची भीतीदेखील व्यक्त होत आहे.

उन्हात काम करीत असताना काँक्रिटच्या कामात पाणी जास्त टाकण्यात आल्याने अनेक ठिकाणी रस्त्याला तडा गेल्याचे दिसते. जिथे-जिथे तडे गेले त्या ठिकाणी नव्याने काम करण्यात येईल.

-विनोदकुमार पांडे, जनसंपर्क अधिकारी, दिलीप बिल्डकॉन कंपनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com