चोरीचे एटीएम कार्ड वापरून पावणेदोन लाख लंपास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर : परतीच्या प्रवासासाठी दिल्ली रेल्वेस्थानकावर गेलेल्या नागपूरकर महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. पर्समधील वेगवेगळ्या बॅंकांच्या एटीएम कार्डचा वापर करून चोरट्याने एकूण पावणेदोन लाख रुपये लंपास केले. महिलेच्या तक्रारीवरून नागपूर लोहमार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताबर्डीतील एका व्यावसायिक कुटुंबातील 63 वर्षीय महिला दिल्लीला गेली होती. दिल्लीहून परतीच्या प्रवासासाठी 14 सप्टेंबरला दुपारी नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर गेली. त्यांच्याकडील खांद्यावरील बॅगमध्ये एटीएम कार्ड, बॅंक लॉकरच्या चावीसह अन्य साहित्य असलेली छोटी पर्स होती. चोरट्याने गर्दीचा फायदा घेत बॅगमधील छोटी पर्स चोरून नेली. दिल्लीतच चोरीची घटना उघडकीस आली. यावेळी त्यांची मुलगीसुद्धा त्यांच्या सोबत होती. मात्र, तोवर गाडीची वेळ झाली होती. 12442 नवी दिल्ली-बिलासपूर राजधानी एक्‍स्प्रेसमधून ती नागपूरच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, पर्समध्ये एटीएम कार्ड आणि त्यांचे क्रमांकसुद्धा लिहिले होते. 16 सप्टेंबर रोजी चोरट्याने तिन्ही कार्डचा उपयोग करीत एकामागून पैसे काढले. पंजाब नॅशनल बॅंकेतील खात्यातून 90 हजार, आयडीबीआयच्या खात्यातून 61 हजार आणि बॅंक ऑफ बडोदामधील खात्यातून 24 हजार 600 रुपये काढून घेतले. मोबाईलवर मिळालेल्या मॅसेजवरून चोरट्याने पैसे काढल्याचे लक्षात आले. महिलेने मंगळवारी कुटुंबीयांसह नागपूर लोहमार्ग ठाणे गाठून चोरीची तक्रार दिली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण दिल्ली लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Using a stolen ATM card Pawdone two million lamps