उत्कर्षाच्या आत्महत्येने पवनार शहारले

राहुल खोब्रागडे - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पवनार (जि. वर्धा) - दोन वर्षांपूर्वीच घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केली. त्यामुळे पत्नी आणि दोन मुलींवर आभाळच कोसळले. गरिबीमुळे आईने दोन मुलींपैकी मोठी उत्कर्षा हिला दहावीच्या शिक्षणाकरिता पुण्याजवळील वाघोली येथील सेवाभावी बीजेएस शैक्षणिक संकुलात पाठविले. मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि आयुष्यातील दुःख हलके होईल, अशी आस लावून बसलेल्या त्या माउलीला उत्कर्षाच्या आत्महत्येचे वृत्त कळताच शोक अनावर झाला आणि गावही शहारून गेले.

येथील विनोद अंबुलकर यांनी दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. ते भूगाव येथील लायड्‌स पोलाद कारखान्यात कामगार होते. मिळकतीत कुटुंबाचा भार चालविणे शक्‍य नव्हते. त्यामुळे ते कर्ज काढत गेले. कर्जबाजारीपणा आणि कुटुंब चालविण्यात असमर्थ असल्याच्या निराशेतून विष प्राशन करून त्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यांच्यापश्‍चात पत्नी सुनंदा, मुली उत्कर्षा व वैष्णवी एकाकी पडल्या. सुनंदावर दोन्ही मुलींची जबाबदारी आली. पती असेपर्यंत त्या शिवारातच शेतमजुरीला जायच्या; पण पतीच्या निधनानंतर त्यांना येथील चिन्मय साधना केंद्रात काम मिळाले. केंद्रातील कामाचे सुनंदाला महिन्याला अडीच हजार रुपये मिळतात. या मिळकतीत मुलींचे शिक्षण शक्‍य नसल्यामुळे त्यांनी उष्कर्षाला पुढील शिक्षणाकरिता पुण्याजवळील वाघोली येथील बीजेएस शैक्षणिक संकुलात दाखल केले. ही संस्था आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेते. मोठ्या मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था झाल्याने सुनंदाला दिलासा मिळाला होता. उत्कर्षा यंदा दहावीला होती.

मंगळवारी (ता. 13) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास उत्कर्षाने वाघोली येथील संस्थेच्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली. रात्री दहाच्या सुमारास घटनेची माहिती वसतिगृह अधिकाऱ्यांनी उत्कर्षाची आई सुनंदा यांना दिली. ही भयावह घटना ऐकून सुनंदा निःशब्दच झाल्या. त्यांच्यावर मोठा आघात झाला. आज, बुधवारी दुपारी चारच्या सुमारास उत्कर्षाचा मृतदेह गावात आणण्यात आला. सायंकाळी अतिशय शोकाकूल वातावरणात तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उत्कर्षाने असे का केले?
उत्कर्षाने आत्महत्या का केली, हा प्रश्‍न सर्वांनाच अस्वस्थ करीत आहे. तीन-चार दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचे दुसरे पुण्यस्मरण झाले. याकरिता उत्कर्षाची पवनारला यायची इच्छा होती; मात्र आई सुनंदा यांनी तिला पैशांची तजविज झाल्यावर नंतर येशील, असे समजावले होते. वाघोली येथील शैक्षणिक संकुलात ती सुरुवातीला आनंदी होती, अशी माहितीही कळली. पुढे काय झाले, ज्यातून तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला, याविषयी काहीच कळू शकले नाही. उत्कर्षाच्या आत्महत्येविषयी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आप्तांनी केली आहे.

Web Title: utkarsh suicide