तीनशे वर्षांचा इतिहास रेखाटलेली दरी उपेक्षित

नागपूर ः एक किलोमीटर दरीवर रेखाटलेले गोंड राजे बख्त बुलंद शहा यांच्या राज्याचा विस्तार.
नागपूर ः एक किलोमीटर दरीवर रेखाटलेले गोंड राजे बख्त बुलंद शहा यांच्या राज्याचा विस्तार.

नागपूर  : शहराच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त एक किलोमीटर लांब दरीवर नागपूर शहराचा तीनशे वर्षांचा इतिहास रेखाटण्यात आला. विशेष म्हणजे नव्या पिढीला शहराच्या इतिहासाची माहिती व्हावी, या हेतूने शेख तय्यब महाजन यांनी तयार केलेली ही दरी आजही उपेक्षित आहे. त्यांची पुढील पिढी या दरीचा "इंडिया बुक ऑफ रेकार्ड'मध्ये समावेशासाठी एकाकी धडपड करीत आहे. सामान्य जनतेपर्यंत, विशेषतः नव्या पिढीपर्यंत शहराचा इतिहास पोहोचविण्यासाठी दरीकरिता विशेष संग्रहालयाची इच्छाही जागेअभावी अद्याप अपूर्ण असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
नागपूर शहराने तीनशे वर्षांच्या कार्यकाळात अनेक चढउतार बघितले. शहराचा इतिहास अनेक इतिहासतज्ज्ञांनी पुस्तक स्वरूपात मांडला. परंतु, कुठलीही गोष्ट चित्रांच्या माध्यमातून स्मृतीपटलावर लवकर उमटते व कायम लक्षात राहाते. त्यामुळे विणकाम व चित्रकलेचा सांगड घालून विविध प्रकाराच्या दरी निर्माण करणारे शेख तय्यब महाजन यांनी 1985 मध्ये 1 किलोमीटर लांब व तीन फूट रुंद दरीवर शहराचा इतिहास साकारण्याचा निर्धार केला. 15 ऑगस्ट 1993 मध्ये त्यांनी 1 किमी दरी विणण्यास सुरुवात केली. 2003 मध्ये ही दरी त्यांनी शहराच्या इतिहासातील प्रसंगाच्या तीनशे चित्रांच्या समावेशासह साकारली. गोंड राजांनी वसविलेले शहर, भोसल्यांनी केलेला शहराचा विकास, इंग्रजांनी आणलेल्या आधुनिक सुविधा सारे काही तीनशे चित्रांमध्ये साकारण्यात आले आहे. ही दर देशातील प्रत्येक हॅण्डलूम प्रदर्शनात ठेवण्यात आले. देशातील नेते, विदेशी पर्यटकांनीही तिचे कौतुक केले. या दरीसाठी शेख तय्यब महाजन यांना अनेक राज्य तसेच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. आता तय्यब महाजन सत्तरीच्या घरात असून त्यांची पुढील पिढी, मुलगा मोहम्मद कदीर महाजन या दरीची काळजी घेत आहे. 1 किमी लांब दरी ठेवण्यासाठी विशेष संग्रहालयाची गरज आहे. त्यासाठी महापालिका किंवा राज्य शासनाने जागा देण्याची गरज असल्याचे 31 वर्षीय मोहम्मद कदीर महाजन यांनी सांगितले. एखाद्या शहराचा इतिहास साकारलेली 1 किमी लांब दरी एकमेव असून तिचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही शेख तय्यब महाजनाने सांगितले.
व्यवसायाचे पाचगावात प्रशिक्षण
मोहम्मद कदीर महाजन यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले पाचगावातील महिलांना दरी विणण्याच्या कामाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला. यासाठी त्यांना मागील वर्षी राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.
जपानची ऑफर धुडकावली
नागपूरचा इतिहास रेखाटलेली ही दरी जपानच्या एका कंपनीला एवढी आवडली की पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या कंपनीने शेख तय्यब महाजन यांना चार कोटींची ऑफर दिली होती. परंतु, महाजन यांनी जपानची ऑफर धुडकावली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com