वऱ्हाडीतून मराठी? पुरावे द्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

नागपूर - कुठल्याही भाषेच्या उगमाबद्दल विधान करताना त्याचे संदर्भ, संशोधन किंवा पुरावे द्यायला हवे. त्यातल्या त्यात मराठीची निर्मिती प्राकृतमधून झालेली आहे, हे स्पष्ट असताना वऱ्हाडच्या बोलीतून झाली असे कुणी म्हणत असेल तर ते सिद्ध करायला हवे, असा निष्कर्ष भाषातज्ज्ञांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून निघाला. 

नागपूर - कुठल्याही भाषेच्या उगमाबद्दल विधान करताना त्याचे संदर्भ, संशोधन किंवा पुरावे द्यायला हवे. त्यातल्या त्यात मराठीची निर्मिती प्राकृतमधून झालेली आहे, हे स्पष्ट असताना वऱ्हाडच्या बोलीतून झाली असे कुणी म्हणत असेल तर ते सिद्ध करायला हवे, असा निष्कर्ष भाषातज्ज्ञांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून निघाला. 

इचलकरंजीत सुरू असलेल्या राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले यांनी अध्यक्षीय भाषणात ‘वऱ्हाडच्या बोलीतून मराठीची निर्मिती’ असे विधान केले. कुणी याला पुरावे नसलेले धाडसी विधान म्हटले आहे, तर कुणी सिद्ध करण्याचे आव्हान दिले. सात वर्षांपूर्वी डॉ. प्रतिमा इंगोले यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. बोलींच्या अभ्यासकांमध्ये त्यांचे नाव कायम अग्रस्थानी असून, या विधानामुळे साहित्य क्षेत्रातील मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत. संत साहित्य, बोली भाषा, भारतीय भाषा आदींच्या अभ्यासकांनी डॉ. इंगोले यांच्या विधानावर आपली मते व्यक्त केली. 

भावनिक पातळीवर ही कल्पना चांगली आहे. पण, वऱ्हाडच्या बोलीतून मराठीची निर्मिती झाली, हे शास्त्रशुद्ध इतिहास काही दर्शवत नाही. 
- डॉ. गणेश देवी, भारतीय भाषांचे अभ्यासक

मी सध्या प्रवासात असल्याने डॉ. प्रतिमा इंगोले यांचे भाषण वाचलेले नाही. पण, मराठी ही ज्ञानभाषा असली तरी बोली भाषाच तिला समृद्ध करीत असते. ललित साहित्यात तर बोलीचे महत्त्व मोठेच आहे.
- लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य संमेलनाध्यक्ष

मराठीचा उगम प्राकृत-महाराष्ट्रीपासून झाला. ही भाषा महाराष्ट्रात सर्वदूर बोलली जात होती. त्या भाषेचे साहित्यही वऱ्हाडात निर्माण झाले. पण, उगम वऱ्हाडच्या बोलीतून झाला असे म्हणता येणार नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे धाडसी विधान आहे.
- डॉ. प्रमोद मुनघाटे, बोलीभाषांचे अभ्यासक

संशोधक किंवा अभ्यासकाने आपल्या संशोधनाचे शास्त्रीय स्रोत द्यायला हवे. त्याची शास्त्रीय मिमांसा करायला हवी. ‘वऱ्हाडच्या बोलीतून मराठीची निर्मिती’ हे विधान सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. कुठल्याही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने अतिशय जबाबदारीने व संशोधनपूर्वक मते मांडली पाहिजे.
- डॉ. किशोर सानप, संत साहित्याचे अभ्यासक

Web Title: varhadi marathi language proof