प्राथमिक शाळेजवळ मटकाअड्डा, मारेगावातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

यवतमाळ : मारेगाव शहराला अवैध धंद्यांनी विळखा घातल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद शाळेजवळ मटकाअड्डा सुरू असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

यवतमाळ : मारेगाव शहराला अवैध धंद्यांनी विळखा घातल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद शाळेजवळ मटकाअड्डा सुरू असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
मारेगाव शहरात अवैध धंद्यांनी डोके चांगलेच वर काढल्याने बेरोजगार तरुण, शेतकरी विळख्यात सापडले आहेत. अनेक कुटुंबांत वाद-विवादाच्या घटना सातत्याने घडत आहेत. पैशाच्या लालसेने मजूरवर्ग जुगाराच्या आहारी जात आहेत. त्यामुळे ते कर्जबाजारी होत आहेत. शिक्षणाचा पाया असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या जवळच मटकाअड्डा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. सोशल आणि मनोरंजनाच्या नावाखाली वणी रोडवर क्‍लब सुरू करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याचा फायदा घेत दररोज रात्री दारू तस्करी सुरू आहे. शासकीय गोडावूनमधील क्वॉइन बॉक्‍सचा व्यवसाय तरुणाईला उद्‌ध्वस्त करीत आहे. अवैध धंदे बंद करण्याचा ठराव नगरपंचायतीत संमत करण्यात आला आहे. तरीदेखील पोलिस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. मार्डी व आंबेडकर चौकात विद्यार्थ्यांची कायम गर्दी असते. त्यामुळे वाहतूक शिपायाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अवैध धंदे बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाप्रमुख भारत मत्ते, स्वप्नील धुर्वे, नगरसेविका जिजा बरारकर, सुरेखा भादिकर, अंकुश माफूर, दयालाल टोंगे, नितीन गोडे, बंडू मोरे, सोनू राजगडकर, भास्कर राऊत, नरेश चौधरी, नरेश मडावी, भुवनेश्‍वर शिंदे, प्रफुल्ल भगत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: varli matka near primaly school